उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही स्वबळाची भाषा केलेली नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी उस्मानाबाद दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देत आहेत. ‘स्वबळा’बाबत पत्रकारांनी विचारणा केली असता टोपे यांनी हे मत व्यक्त केले.
प्रत्येकाने आपला पक्ष वाढवावा. तसा अधिकार सर्वांना आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने कधीही स्वबळाची भाषा केलेली नाही. स्वबळावर लढायचे की आघाडी करायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतात. आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हेच अंतिम निर्णय घेतात. स्वबळाच्या चर्चेमुळे महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही. अगदी विश्वासाने हे शासन सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उस्मानाबादच्या दौऱ्यावर आले होते, यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सोबत होते. या वेळी ते बोलताना म्हणाले की, काही हॉस्पिटलने महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना दिलेला नाही. यासंदर्भातजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित हॉस्पिटलची चौकशी करावी, दोषी आढळल्यास रक्कम संबंधित हॉस्पिटलकडून वसूल करावी, ती रुग्णांच्या नातेवाइकांना द्यावी, असेही निर्देश टोपे यांनी दिले.