हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारावर असलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र लिहून भाजप सोबत जुळवून घेण्याचे आवाहन केलं. दरम्यान या लेटरबॉम्ब बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता जयंत पाटील म्हणाले की सरनाईक यांनी पत्र लिहिलं असलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठल्याही प्रकारचं वितुष्ट येणार नाही.
अलीकडच्या काळात शिवसेनेतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कुणी गेलंय असं झालं नाही. प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे शिवसेना-राष्ट्रवादीत वितुष्ट येईल असं वाटत नाही. ज्यांनी पत्र लिहिलंय त्यांच्या मतदारसंघात कोणी पक्षात प्रवेश केलाय का हे पाहावं लागेल असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे आरोप फेटाळून लावलेत.
प्रताप सरनाईक पत्रात नेमकं काय म्हणाले-
भारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, अशा आशयाचं पत्र प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. काँग्रेस एकला चलो रे ची भूमिका सातत्यानं घेत आहे. राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते कार्यकर्ते फोडत आहेत. अशा परिस्थितीत आपण भाजपसोबत जुळवून घ्यायला हवं, असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.