.. म्हणून अवघ्या तासाभरात अजितदादांनी ते ट्विट केलं डिलीट

मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारं ट्वीट केलं होतं. मात्र तासाभरातच अजित पवारांनी हे ट्वीट डिलीट केलं. त्यामुळे अजित पवारांनी दीनदयाळ यांना अभिवादन करणारं ट्वीट डिलीट का केलं? अशी चर्चा रंगली असताना अजित पवार यांनी यामागचे कारण सांगितलं आहे. “ज्या व्यक्ती हयात नाहीत, त्यांच्याबाबत आपण चांगलं बोलतो ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. त्यानुसार मी हे ट्वीट केलं होतं. परंतु समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी डिलीट केलेल्या ट्वीटबाबत दिली.

अजित पवारांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त ट्वीट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, ज्येष्ठ नेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन, असं ट्वीट अजित पवारांनी सकाळी 8 वाजून 48 मिनिटांनी केलं होतं. मात्र, त्यानंतर तासाभरातच अजित पवारांच्या ट्विटर हॅण्डलवरुन हे ट्वीट डिलीट करण्यात आलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त केलं नाही. परंतु अजित पवार यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन अभिवादनाचं ट्वीट केल्याने, त्यांचं भाजपवरील प्रेम कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. या ट्वीटनंतर दादा रॉक्स, जुन्या आठवणी ताज्या झाल्या, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like