सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील संवेदनशील जिल्हा परिषद गट म्हणून वाठार स्टेशन गटाची ओळख आहे. या गटात राष्ट्रवादीची सत्ता असल्याने हा गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. येथील गटात कायम विकासासाठी अग्रेसर राहून काम करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून डॉ. अभय तावरे यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीच्या शिर्डीतील मेळाव्यास जाण्याऐवजी थेट शिंदे गटात प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिर्डी येथे दोनदिवसीय मंथन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. येथील शिबिरास सातारा जिल्ह्यातही कार्यकर्ते गेले होते. मात्र, जिल्ह्यातील वाठार स्टेशन गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. अभय तावरे यांनी कार्यकर्त्यांसह शिबिरास जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीररित्या प्रवेश केला.
जिल्ह्यातील वाठार स्टेशन गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने याठिकाणी राष्ट्रवादीला खिंडार पडल्याचे दिसत आहे. या प्रकारामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणनीतीची ही सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे. डॉ. अभय तावरे यांचा जाहीर प्रवेश याचेच द्योतक ठरत आहे.