“लोकांनी मला सलग ६ वेळा निवडून दिले, प्रसाद लाड यांनी जनतेमधून एकदा तरी निवडून दाखवावे”; खडसेंचे चॅलेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । ‘खडसे स्वतःच्या लेकीला का निवडून आणू शकले नाहीत? असं विचारत महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी खडसेंना चिथावले होते. प्रसाद लाड यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “जनतेने मला सलग ६ वेळा निवडून दिले, प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी जनतेमधून किमान एकदा तरी निवडून येऊन दाखवावे” असं खुलं आवाहन खडसेंनी प्रसाद लाड यांना दिलं आहे.

“मी भाजमधून गेल्याचा परिणाम होत नसेल, तर भाजपचे पदाधिकारी वारंवार ‘एकनाथ खडसे गेल्यावर परिणाम होणार नाही’ असं का म्हणतात? माझं नाव वारंवार का घेत आहेत?” असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला. उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पूर्वीपेक्षा कमी आमदार निवडून आले आहेत, असं खडसे म्हणाले.“माझ्या मुलीचा पराभव करण्यासाठी पक्षविरोधी काम करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा आतूनच ही जागा पाडण्यासाठी पाठिंबा होता” असा पुनरुच्चारही एकनाथ खडसे यांनी केला.

नेमकं काय म्हणाले होते प्रसाद लाड?
राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना डोक्यावर चढवले आहे. एकनाथ खडसे यांच्यात इतकीच ताकद होती, तर मग मुक्ताईनगरमधून ते स्वत:च्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत? असा सवाल भाजप नेते प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता. भाजप सोडल्यानंतर आता एकनाथ खडसे यांचा उलट प्रवास सुरु झाला आहे. स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची तडफड सुरु आहे. त्यांना काय करायचं ते करू दे, आम्ही उत्तर महाराष्ट्रात आमच्या परीने काम सुरु ठेवू, असे प्रसाद लाड म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक हल्ला करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांना डोक्यावर चढवत आहे. उत्तर महाराष्ट्रात कोणी किती दौरे केले तरी भाजपचे कोणतेही नुकसान होणार नाही. उत्तर महाराष्ट्रात भाजपला मानणारा एक वर्ग आहे. त्या ठिकाणी गिरीश महाजनही आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्याने फरक पडणार नाही. आम्ही आमचे काम करत राहू, असेही प्रसाद लाड म्हणाले होते.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in