मुंबई । बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्हत्येला एक महिना उलटून गेला असला तरी हे प्रकरण थांबायचं नाव घेत नाही. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्या वडिलांनी देखील बिहारमध्ये तक्रार दाखल केली आहे. रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
सुशांत सिंह यांच्या आत्महत्येनंतर त्याला दुर्दैवाने जास्त प्रसिद्धी मिळतेय, अशी खंत यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केली. तसेच सुशांत चांगला, दर्जेदार कलाकार होता, त्याच्या जाण्याने सिनेसृष्टीचं नुकसान झालं आहे, असं ही पाटील यावेळी म्हणाले.
पण हा विषय पोलिसांच्या सरळ चौकशीवर मर्यादीत ठेवावा. त्याचा चिघळून चोथा करण्यात अर्थ नाही. त्याने आत्महत्या केलीय, जो चौकशी अधिकारी आहे त्यांने वस्तुस्थिती समोर आणावी आणि याला पूर्णविराम द्यावा, असंही ते यावेळी म्हणाले. आपल्यातून गेलेल्या व्यक्तीच्या खाजगी जीवनाबद्दल जास्त चर्चा होणं योग्य नाही. त्यामुळे चर्चा न करता हा विषय इथेच थांबवला पाहिजे. बिहारच्या पोलीसांना जी माहिती हवी ती मुंबई पोलिस देतील, असं ही ते यावेळी म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”