इंधन दरवाढीमुळे पूर्वी आंदोलने करणारे सत्ताधारी आज मात्र मूग गिळून गप्प; जयंत पाटलांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सर्वत्र इंधन दरवाढ व महागाई वाढीमुळे केंद्र सरकार विरोधात जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे सोयाबीन पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने त्याला केंद्राकडून भरपाई न दिली जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी मोडी सरकारवर निशाणा साधला आहे. “पूर्वी थोडे जरी दर वाढले तरी सत्ताधारी पक्षाचे लोक मोर्चा, आंदोलने करीत होते. पण आज मात्र तेच मूग गिळून गप्प आहेत,” अशी टीका पाटील यांनी केली आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, “आज इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. पूर्वी थोडे जरी दर वाढले तरी सत्ताधारी पक्षाचे लोक मोर्चा, आंदोलने करीत होते पण आज मात्र ते मूग गिळून गप्प आहेत. सर्वत्र स्वतःचे फोटो प्रकाशित करून मोफत लस उपलब्ध करून दिल्याचा केंद्र सरकारने आव आणला. मात्र इंधनावर अधिक टॅक्स लावून जनतेकडून पैसे उकळल्याची बतावणी स्वतः केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्रीच करतात. हा भाजपचा खरा चेहरा आहे.”

“सर्व गोष्टींचे दर वाढत असताना, सोयाबीनचे दर वाढले तेव्हा आनंद झाला होता. आमच्या शेतकरी बांधवाला दिलासा मिळाल्याने समाधान वाटले. परंतु आजचे सोयाबीनचे दर पाहिले तर याला जबाबदार कोण हे जाणून घेतले पाहिजे हे प्रकर्षाने जाणवते,” असे म्हणून जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Leave a Comment