मुंबई । पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानं १६ मे २०११ रोजी एक ट्विट केलं होतं. “मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण इंधनाच्या किमती पुन्हा रॉकेटप्रमाणे वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती,” असं ट्विट अक्षय कुमार यानं केलं होतं. आपल्या ट्विटमधून अक्षय कुमारनं २०११ मध्ये वाढत असलेल्या इंधन दरवाढीवर चिंता व्यक्त केली होती.
दरम्यान, गुरूवारी पेट्रोलियम कंपन्यांनी सलग १९ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. यानंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८६.७० रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७८.३४ रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता अक्षय कुमारला त्यांच्या ट्विटची आठवण करून देत काही सवाल करत टोला लगावला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेता अक्षय कुमारच्या ट्विटला रिट्विट करत लिहलं आहे “तू ट्विटरवर अक्टिव्ह आहेस का? तू गाड्या वापरणं बंद केलंय का? तू वृत्तपत्र वाचत नाहीस का? तुझ्या माहितीसाठी, पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे,” असं आव्हाड म्हणाले. त्यांनी ट्विटरवर या ट्विटसोबत अक्षय कुमारलाही टॅग केलं आहे.
R u not active on @Twitter …
Have u stopped using cars..
Dnt u read news paper….@akshaykumar ….
There has been a steep #PetrolDieselPriceHike just for Ur information https://t.co/f5Dr1UPFhs— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 25, 2020
गेल्या १९ दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचं सत्र
जूनपूर्वीच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली नव्हती. या काळातील लॉकडाउनच्या कालावधीत इंधनाचा वापरही मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. दरवाढ नसल्याने मे महिन्याच्या अखेरीस शहरामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर सुमारे ७६ रुपये, तर डिझेलचा प्रतिलिटर दर ६५ रुपयांच्या जवळपास होता. परंतु आता गेल्या १९ दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचं सत्र मात्र कायम आहे. दरम्यान, आजही दिल्लीत पेट्रोलच्या दरात १६ पैशांची तर डिझेलच्या दरात १४ पैशांची वाढ करण्यात आली. गेल्या १९ दिवसांमध्ये डिझेलच्या दरात १०.६२ रूपये आणि पेट्रोलच्या दरात ८.६६ रूपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी (२५ जून) मुंबईत पेट्रोलचा दर ८६.७० रूपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ७८.३४ रूपये प्रति लिटर आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरारवर कच्च्या तेलाची किंमत कमी असली तरी देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होऊन ते ४० डॉलर्स प्रति बॅरलच्या जवळपास आलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.’