हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल (Mohammad Faizal) यांना दुसऱ्यांदा अपात्र ठरविण्यात आले आहे. यामुळे त्यांची लोकसभेची खासदारकी रद्द झाली आहे. केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) हत्येचा प्रयत्न खटल्याप्रकरणी खासदार फैजल यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे बुधवारी लोकसभा सचिवालयाने अधिसूचना जारी करत, मोहम्मद फैजल यांना अपात्र ठरवले आहे. तसेच त्यांचे लोकसभेचे सदस्यत्वही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी देखील मोहम्मद फैझल यांना अपात्र ठरविण्यात आले होते.
11 जानेवारी रोजी कर्नाटकच्या कावरत्ती सत्र न्यायालयाने खासदार फैजल यांना खुनाचा प्रयत्न प्रकरणात दोषी ठरवून तब्बल दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर 12 जानेवारी रोजी मोहम्मद फैसल यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केरळ उच्च न्यायालयात अपील केले होते. याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने अधिसूचना जारी करुन फैजल यांचे सदस्यत्व रद्द केले होते. पुढे निवडणूक आयोगाने लक्षद्वीपमधील पोटनिवडणुकीची घोषणा केल्यानंतर फैजल यांनी आयोगाच्या प्रेस नोटला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यानंतर केरळ उच्च न्यायालयाने शिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु आता ऑगस्ट महिन्यात केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपने दाखल केलेल्या अपीलावर सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला आहे. ज्यामुळे या प्रकरणावर कारवाई करत लोकसभा सचिवालयाकडून मोहम्मद फैजल यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. सचिवालयाने काढलेल्या आदेशानुसार, येत्या 11 जानेवारी पासून लोकसभेच्या सदस्यत्वासाठी मोहम्मद फैजल यांना अपात्र घोषित करण्यात येत आहे. दरम्यान, मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे त्यांचा मोठा धक्का शरद पवार यांना बसला आहे. आधीच राष्ट्रवादीचे अनेक नेते अजित पवार यांच्या बरोबर गेल्यामुळे शरद पवार यांच्याकडे मोजके नेते उरले आहेत. यामध्येच आता फैजल यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे त्यांचा तोटा शरद पवारांना बसण्याची शक्यता आहे.