अहमदनगर । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून भाजप नेत्यांच्या दाव्यांचा चांगलाच समाचार घेतला.” सुशांतसिंह राजपूत यांची हत्या झाल्याचं तुम्ही म्हणता आणि पुरावेही देत नाही. भाजपकडे जर या प्रकरणातील पुरावे असतील, तर त्यांनी ते महाराष्ट्र सरकार व पोलिसांना द्यावेत. पुरावे नसताना ते गंभीर आणि मोठी वक्तव्ये करत असतील, तर ते राजकारण करीत आहेत, हे माझ्यासारख्याच काय तर सर्वसामान्य नागरिकांनाही कळतं,’ असा टोलाही त्यांनी लगावला. नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीच्या निमित्ताने रोहित पवार हे आले होते. यावेळी ते बोलत होते.
सामान्य माणसालाही कळतंय भाजप राजकारण करतेय
भाजपचा सोशल मीडिया सक्षम आहे. या मीडियावर एखादा ट्रेंड चालवणे त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जमते. भाजपचे नेते शब्दात खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. आज सुशांतसिंह राजपूत प्रकरणात तेच चालू आहे. भाजपकडे जर या प्रकरणातील पुरावे असतील, तर त्यांनी ते महाराष्ट्र सरकार व पोलिसांना द्यावेत. पुरावे नसताना ते गंभीर आणि मोठी वक्तव्ये करत असतील, तर ते राजकारण करीत आहेत, हे माझ्यासारख्याच काय तर सर्वसामान्य नागरिकांनाही कळतं,’ असा टोलाही रोहित पवार यांनी भाजपला लगावला.
सारा आटापिटा बिहार निवडणूक जवळ आल्याने
‘मुंबई पोलीस योग्य पद्धतीने पाठपुरावा करीत असताना भाजपने त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. पण सध्या बिहार निवडणूक जवळ आली आहे. तेथे वाद वेगळा सुरू झालाय. या वादात सुशांतसिंह एका बाजूला राहून राजकारण चालू होईल, व सुशांतसिंहच्या प्रकरणाला वेगळे वळण लागू शकते. त्यामुळे सुशांतसिंह वर अन्याय होऊ शकतो. भाजपकडे या प्रकरणात सरकारमधील कोणी असल्याची नावे असतील, तर त्यांनी ती सांगावीत, व तसे पुरावेही द्यावेत. एका बाजूला हत्या आहे, असे म्हणता आणि दुसऱ्या बाजूला तुमचे पुरावे तुमच्याकडेच ठेवता. मग पुरावे दाबण्याचे काम तुम्हीच करत आहात असे आम्ही म्हणायला हरकत नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला. ‘जर भाजपकडे पुरावे असतील तर ते त्यांनी द्यावेत. कारण अनेकदा ते देऊ देऊ म्हणतात पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे काहीच नसते,’ असा चिमटाही त्यांनी काढला.
राजकारण न करता सुशांतला न्याय कसा मिळेल प्रयत्न यासाठी करा
‘भाजपला या प्रकरणात राजकारण करून काय मिळणार आहे ? असा प्रश्न उपस्थित करताना उगाच ते पोलिसांवर आक्षेप घेतात. गेल्या पाच वर्षापासून ज्या पोलिसांचे भाजपने संरक्षण घेतले, त्याच पोलिसांवर आम्ही विश्वास ठेवला. सरकार बदलले म्हणजे पोलिसांवर आपण आक्षेप घेतलाच पाहिजे असे नसते. त्यामुळे यात राजकारण न करता सुशांतला न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे,’ असा सल्लाही त्यांनी भाजप नेत्यांना दिला.’एक सर्वसामान्य कुटुंबातील बिहारचा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन सिनेसृष्टीत नाव कमवतो. अशा परिस्थितीत ती व्यक्ती आत्महत्या करीत असेल, तर त्याला पार्श्वभूमी काय ? आत्महत्या सोडून इतर काही प्रकार आहे का? हे सर्व लोकांच्या समोर आलेच पाहिजे. पण त्यासाठी मुंबई पोलिस लक्ष देत असतील तर त्यांना काही वेळ देण्याची गरज आहे. यात राजकारण करून केवळ राजकीय पोळी भाजली जाईल. पण त्यात सुशांतला न्याय मिळण्यात अडचण येऊ शकते. पोलिसांवर आक्षेप घेऊन काय मिळणार आहे ? असा प्रश्नही आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”