‘पॉवर’ स्टेअरिंग हाती घेत अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट केलेल्या छायाचित्राची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. रविवारी मध्यरात्री घड्याळावर बाराचा ठोका पडताच आणि २७ जुलै ही तारीख सुरु होताच अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये एका इलेक्ट्रीक वाहनामध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे बसलेले दिसत आहेत. तर, या वाहनाची स्टेअरिंग अर्थात ते चालवण्याची जबाबदारी ही खुद्द अजित पवार यांच्याकडे असल्याचं पाहायला मिळत आहे.

हा अतिशय लक्षवेधी आणि तितकाच बोलका फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितंच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे’.

सध्या सुरु असणारा कोरोनाविरोधातील लढा जिंकत पुरोगामी आणि प्रगत विचारांच्या या महाराष्ट्र राज्याला पुन्हा देशात अग्रस्थानी आणू, असा विश्वास अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी व्यक्त केला. महाविकास आघाडीची राज्यात असणारी सत्ता आणि त्यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या पक्षांच्या भूमिका पाहता पवारांनी पोस्ट केलेला हा फोटो बरंच काही सांगत आहे, असा अनेकांचा तर्क. तेव्हा आता निमित्त काहीही असो, इथं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसमवेत अजित पवारांचा राजकीय वर्तुळातील वावर आणि त्यांचा हा अंदाज चर्चेचा विषय ठरत आहे हे मात्र नाकारता येणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment