मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी सर्वश्रुत आहे. मात्र ती एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत पोहोचल असं पक्षातील नेत्यांना कधीही वाटले नव्हते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी चांदिवली विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भिडले. एकमेकांवर खुर्च्या फेकत, लाठीकाठ्या चालवत पदाधिकाऱ्यांनीच गोंधळ घातला. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीसाठी बोलावलेली बैठक गुंडाळण्यात आली.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी चांदिवली येथे राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष अमित तिवारी यांची बसण्याच्या जागेवरून अन्य पदाधिकाऱ्यांसोबत वाद झाला. स्थानिक बैठक असल्याचे सांगत तिवारी यांना बैठकीतून जाण्यास सांगण्यात आले. या घटनेनंतर तिवारी आपल्या समर्थकांसह पुन्हा बैठकीच्या ठिकाणी आले आणि त्यांनी हाणामारीला सुरुवात केली. एकमेकांवर खुर्च्या फेकत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. या तुफान हाणीमारीत काही कार्यकर्ते जखमी झाले. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी साकीनाका पोलिसांत तक्रार दिली. तिवारी यांनी समर्थकांसह हाणामारी करताना जातिवाचक शिवीगाळ केल्याचीही तक्रार कैलास आगवणे या कार्यकर्त्याने केली असून अॅट्रॉसिटीसह इतर कलमांतर्गत गुन्हा नोंद झाला.
बैठकीत झालेल्या या घटनेची दखल घेण्यात येईल. प्रांताध्यक्ष जयंत पाटील आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासमोर सर्व बाबी मांडून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.