हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात काही लोकांवर काही ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. तर दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे परमबीर सिंग फरार झाले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाना साधला आहे. देशमुखांवर आरोप करणाऱ्या बेपत्ता परमबीर सिंगांना कुणाची साथ आहे? असा सवाल पवार यांनी केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडी, आयकर विभागाच्या वतीने अनेक बढया नेत्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीवर कारवाई केली जात आहे. 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. ही अटकेची कारवाई दुर्दैवी आहे. देशमुख चौकशी यंत्रणेला सहकार्य करत असताना त्यांना अटक होणे हे मुळात दुर्देवी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गेल्या अनेक दिवस फरार होते. ईडीने अनेक वेळा समन्स दिल्यानंतरही ते ईडी कार्यालयात हजर राहत नव्हते. परंतु काल ते अचानक ईडी कार्यालयात हजर झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 13 तास त्यांची मॅरेथॉन चौकशी केली. अखेर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास देशमुख यांना अटक करण्यात आली. हि घटना अतिशय दुर्देवी अशी असल्याचे पवार म्हणाले.