हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असून भाजप कडून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यातच उदयनराजे भोसले यांनी सरकारवर ताशेरे ओढले होते. देवेंद्र फडणवीस यांना सत्ता द्या, मी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो असे खासदार उदयनराजे म्हणत आहेत, त्यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस सरकारने राष्ट्रपतींची मंजुरी न घेण्याची त्रुटी मुद्दामहून की अनावधानाने ठेवल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली आहे.ती स्थगिती उठविण्यासाठी केंद्र सरकारनेही तशी भूमिका घेत हस्तक्षेप करत पुढाकार घ्यायला हवा. हा विषय राज्य सरकार आणि याचिकाकर्ते यांच्यापुरता मर्यादित नाही तर त्यात केंद्र सरकारचीही भूमिका आहे. हे फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि उदयनराजे यांनी लक्षात ठेवावे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
भाजप व त्यांच्या नेत्यांना खरेच आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने या याचिकेत हस्तक्षेप करुन आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठीचे प्रयत्न करावेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दोषारोप करुन विषयांतर करु नये, असे प्रत्युत्तर शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.
२०१४ मध्ये त्यावेळी आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण देऊ केले व निवडणुकीपर्यंत या आरक्षणाला धक्क़ा लागला नाही. मात्र निवडणुकीनंतर ते आरक्षण भाजपा सरकारच्या काळात न्यायालयात टिकले नाही किंवा टिकवू दिले गेले नाही. त्यानंतर या मागणीसाठी लाखांचे मोर्चे निघाले. जनमताचा दबाव वाढल्याने फडणवीस सरकारला यासंबंधीचा निर्णय घ्यावा लागला. परंतू, असा निर्णय घेताना तो १०० टक्के कायदेशीर पातळीवर टिकेल असा न घेता राष्ट्रपतींची मंजुरी न घेण्याची त्रुटी मुद्दामहून की अनावधानाने ठेवल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याची आठवण शिंदे यांनी करून दिली.
अर्णव गोस्वामी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात ताडीने सुनावणी झाली. तर, लाखो मराठा विद्यार्थी, बेरोजगारांच्या भविष्यासाठी तातडीने सुनावणी घेणे शक्य नाही काय? आरक्षणावरील स्थगिती उठावी, अशी महाविकास आघाडीची प्रामाणिक इच्छा आहे. सर्वोच्च न्यायालयात कोणाचे चालते, हे जगजाहीर आहे. खासदार उदयनराजेंनी हे समजून घ्यावे. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला सांगून सुनावणी तातडीने घेण्यासाठी तसेच केंद्र शासनाने मराठा आरक्षण हे कायदेशीर आहे, अशी स्पष्ट भूमिका न्यायालयात घ्यावी यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’