सातारा | जरंडेश्वर कारखान्यावर सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे. जरंडेश्वर कारखान्यावर सुरू असलेल्या आयकर विभागाच्या छापेमारीच्या निषेधार्थ कोरेगाव शहरात आज दि. 9 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. केंद्र सरकार व केंद्रीय यंत्रणा सुडबुध्दीने करत असलेल्या कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर सलग तीन दिवस छापेमारी सुरू आहे. साताऱ्यातील जरंडेश्वरसह काही ठिकाणी अद्यापही छापेमारीचे सत्र सुरूच आहे. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मुंबईतल्या ऑफिसवर सलग दोन दिवस छापेमारी केली. पुण्यात अजित पवारांच्या दोन बहिणी राहतात. त्यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले.
पंचवटी सोसायटीत रजनी इंदुलकर आणि मोदी बागेत नीता पाटील यांच्या घरांवर छापे सत्र सुरू आहे. कोल्हापुरात अजित पवारांची बहिण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवर छापा घालण्यात आला. तिथे अजूनही छापा सुरु आहे. साताऱ्यात जरंडेश्वर सहकारी कारखान्यातही छापासत्र सुरू आहे. त्याशिवाय अहमदनगरमध्ये अंबालिका साखर कारखाना, बारामतीत सायबर डायनॅमिक्स डेअरी, दौंड साखर कारखाना इथेही छापेसत्र सुरू आहेत. याशिवाय काल सकाळी नंदूरबारमध्ये आयन मल्टीट्रेड साखर कारखान्यावर आयकर विभागाने कारवाई केली आहे.
अशावेळी साताऱ्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसने कारवाईचा निषेध व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आयकर विभागाचे निषेधाचे फलक हातात घेण्यात आले होते. तर अजितदादा एकच वादा असेही फलक होते.
सुनिल माने म्हणाले, ज्या दिवसापासून महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. तेव्हापासून केंद्र सरकारने राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्याच्यावर ईडीची कारवाई जाणीवपूर्वक सुरू केलेली आहे. केंद्राच्या विरोधात बोलेल त्याच्यावर ईडीची कारवाई भाजपाकडून सुरू केली जात आहे.