सांगली प्रतिनिधी । सांगली जिल्हा समाज कल्याण जात पडताळणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर उचित कारवाई व्हावी यानिमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलच्या वतीने समाज कल्याण समोर निदर्शने करण्यात आले. जिल्ह्यातील जात पडताळणी विषयक नागरिकांची कामे जिल्हा समाज कल्याण जात पडताळणी विभाग येथे येतात, परंतु काही व कार्यक्षम अधिकारी यांच्यामुळे विद्यार्थ्यांची व नागरिकांचे कामे वेळेत होत नाहीत.
आज शासनाकडून समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी तसेच उपेक्षित वर्गासाठी विविध योजना राबविल्या जातात, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक सवलती प्रदान केले जातात, त्यासाठी जात पडताळणी आवश्यक बाब मानली जाते. परंतु सदरच्या कागदपत्र विद्यार्थ्यांना व नागरिकांना वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. सांगलीतील जात पडताळणी कार्यालय मध्ये नागरिकाकडून दाखल केलेले अर्ज हे महिनो-महिने कार्यवाही विना पडून राहतात. नागरिकांनी विचारणा केली की त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थी व पालकांनी उद्धट व अपमानास्पद वागणूक देतात व कोणतेही दाद देत नाहीत नागरिकांची विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक म्हणावी लागेल, त्यामुळे कुठे तरी हा आर्थिक बाजार थांबवणे गरजेचे आहे व गोरगरीब नागरिकांना व विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे.
विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध झाली पाहिजे त्यानिमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल सांगली जिल्ह्याच्या वतीने समाज कल्याण कार्यालयासमोर निदर्शन करत समाज कल्याण अधिकार्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.