हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाचं आरक्षणं हे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलं आहे, यासाठी राज्यातील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत आहेत. तेच नेते आता सत्तेत आहेत असा गंभीर आरोप भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. मंडल आयोगलागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही असा थेट सवाल त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांना सोयीप्रमाणे मराठा समाजाचा विसर पडला. या मुद्द्यावर राज्य सरकारनं पुढाकार घ्यायला हवा होता असे उदयनराजे म्हणाले. दरम्यान उदयनराजेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“ते नेमकं काय बोलले हे मला माहिती नाही त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण आज एकमेकांवर टीका करण्याची गरज नाही. एकत्र राहून आरक्षणाच्या बाबतीत मार्ग काढावा लागेल. कोणाला श्रेय घ्यायचं नाही. लाखो लोक गेली कित्येक वर्ष लढत आहेत त्यांना श्रेय जाणार आहे. लवकरात लवकर प्रश्न मार्ग लागेल असा विश्वास आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी बोलत नाही, तर शिवाजी महाराजांच्या संकल्पनेवर आधारित समाजाच्या भूमिकेतून बोलत आहे. आपल्या आधीची जी पिढी राजकारणात आहे त्यांना मला प्रश्न वाचारायचा आहे की, तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित का ठेवला? इतरांचा अधिकार कमी करा अशी मागणी मराठा समाजाने कधीच केली नाही. पण आमच्यावर अन्याय का? ज्यांनी अन्याय केला ते आज सत्तेत आहेत. अन्य समाजाचं आरक्षण, अधिकार अबाधित ठेवा. पण मराठा समाजावर अन्याय का?, आज जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं आहे असा आरोप उदयनराजेंनी केला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’