पुणे पदवीधरमध्ये भाजप स्वतःच्याच सापळ्यात अडकली; ‘ही’ खेळी आली अंगलट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीने यंदा खेचून घेतली. चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेषत: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे नागपूरमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे पुण्यातून पाटील यांना झटका बसल्याचे यातून स्पष्ट झाले. महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड पहिल्याच पसंतीची मते घेऊन विजयी झाल्याने भाजपवर नामुष्कीची वेळ आली आहे. पुण्यात सर्वाधिक मते असताना पुण्याबाहेरील उमेदवार देऊन भाजपने खेळलेली नवी खेळी त्यांच्या अंगलट आल्याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, तसेच चंद्रकांत पाटील यांनी दोन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. यंदा पुण्यातून इच्छुकांची संख्या जास्त होती. मात्र, भाजपने पुण्याऐवजी सांगलीतील संग्राम देशमुखांना उमेदवारी दिली. यामागे सामजिक गणिते मांडण्यात येत होती. सांगलीतून तीन उमेदवार असल्याने विभागणी होईल आणि पुण्यासारख्या ठिकाणी केलेल्या नोंदणीच्या बळावर यश मिळेल, असे भाकित भाजपकडून करण्यात येत होते. मात्र, सांगलीतून देशमुख यांचे कट्टर विरोधक राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह कोल्हापुरातून सतेज पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यासह शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची गणिते परस्परांवर अवलंबून होती.

पश्चिम महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्था, भारती विद्यापीठ आणि विवेकानंद शिक्षण संस्था या तीन संस्था प्रभावी मानल्या जातात. त्यापैकी भारती विद्यापीठासह काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांच्या शिक्षण संस्थांमधून जयंत आसगावकर आणि लाड यांच्यासाठी मोठी यंत्रणा पद्धतशीरपणे वापरण्यात आल्याचे आघाडीच्या गोटातून सांगण्यात आले. याशिवाय बाहेरचा उमेदवार लादल्याची भावना पुण्यातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली, तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उमेदवार असता, तर फरक पडला असता, अशीही कुजबूज एका गोटातून सुरू झाली.

आघाडीकडून पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढविण्यात येत असल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. ही निवडणूक रंगतदार होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, लाड यांनी विजयासाठी निश्चित केलेल्या कोटा पहिल्याच पसंतीत मिळविला. त्यांनी एक लाख २२ हजार १४५ पहिल्या पसंतीची मते घेऊन विजय साकारल्याने भाजपच्या जिव्हारी लागणारा हा निकाल ठरला. पुण्यातून ६१ हजार ४०४ मतदारांनी मतदान केले होते. त्या खालोखाल कोल्हापूरमध्ये ६० हजार ९६२ मतदार होते. त्यामुळे पुण्यातील मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार होती. मात्र, निकालाचा कल पाहता पुणेकरांनी भाजपचे देशमुख यांना फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे स्पष्ट झाले.

देशमुख यांना अवघ्या ७३ हजार ३२१ मतांवर समाधान मानावे लागले. या मतांमध्ये पुण्यातील पारंपरिक मते असली, तरी देशमुख यांचा अन्य जिल्ह्यांतही निभाव लागला नाही. पालिका निवडणुकीवर परिणाम? पुणे महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२मध्ये होणार आहेत. महापालिका निवडणुका स्थानिक प्रश्नांवर होत असल्या, तरी या निकालाचा परिणाम हा महापालिकेच्या निकालावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पुण्यात आणखी २३ गावांचा समावेश करण्यात येणार आहे. या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही प्रमाणात काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे भाजपसाठी हा पराभव भविष्यातील ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’