मुंबई । करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर मुंबईत अडकून पडलेल्या परराज्यातील मजुरांत अस्वस्थता वाढली आहे. देशभरात लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने मुंबईत त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील परराज्यातील हजारो मजुरांनी थेट वांद्रे स्टेशनवर धडक दिली. वांद्रे स्टेशनबाहेर ठिय्या देऊन हे मजूर गावाला जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी करत होते. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा दाखल होता. दरम्यान, या जमावाला शिताफीनं पांगवण्यात पोलिसांना यश आलं आहे.
पंतप्रधान मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढण्याचा निर्णय घेतला. मुंबईसारख्या महानगरातील स्थलांतरित मजुर गेल्या २१ दिवसांच्या लोकडाऊनमध्ये कसे तरी तग धरून होते. पण आता या मजुरांकडे काम नाही, पोटाला पुरेस अन्न नाही अशा संकटात सापडलेला परप्रांतीय मजूरवर्ग आज वांद्रे स्टेशन बाहेर एकत्र आले होते. दरम्यान, पोलिसांनी हा जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. सगळ्या जमावामध्ये रोजंदारीवर काम करणारे कामगार या ठिकाणी जमले होते. लांब पल्ल्याची गाडी सोडा अशी मागणी या सगळ्या कामगारांनी आणि मजूर वर्गाने केली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत हा सगळा जमाव पांगवला आहे. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्यांची समजूत काढली. वांद्रे पश्चिम या ठिकाणी ही घटना घडली. वांद्रे बेस्ट बस डेपोजवळ अनेक लहान मोठे कारखाने आणि फर्निचरची दुकानं आहेत. या दुकानांमध्ये काम करणारे मजूर आणि कामगार हे गावी जाण्यासाठी या ठिकाणी जमले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”