कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर कराड येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची (एनडीआरएफ) एक तुकडी दाखल झाली. या तुकडीतील जवानांनी कराडच्या प्रीतिसंगमावर पोलीस, महसूल आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिक दाखवले.
बोट चालविण्याचे प्रशिक्षण देऊन आपत्तीच्या काळात पुराच्या पाण्यात बुडणाऱ्यांना कसे वाचवायचे, त्यांना बोटीत कसे घ्यायचे, याचे प्रात्यक्षिक एनडीआरएफच्या जवानांनी दाखवले. पुरातून बाहेर येताना बोटीत किती लोक बसवायचे, बोटीचा समतोल कसा साधायचा, याबद्दलही मार्गदर्शन केले.
दरम्यान गतवर्षी कराड आणि पाटण तालुक्यातील ज्या गावांना पुराचा फटका बसला होता. त्या गावांमधील पोहणाऱ्या युवकांना बोट चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे एनडीआरएफ तुकडीचे निरीक्षक सचिन नलावडे यांनी सांगितले. यावेळी कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे, एनडीआरएफ टीमचे निरीक्षक सचिन नलावडे, मंडल अधिकारी महेश पाटील, विनायक पाटील यांच्यासह नगरपालिका, पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.