थर्ड अँगल | अमीर सलीम इनामदार
वर्तमानकालीन कोरोना वैश्विक संकटाने जग, भारत आणि महाराष्ट्राला ग्रासून टाकले आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि जनसहभागातून कोरोनाचं संकट परतावून लावण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. या संकटाने आपणा सर्वांना दिलेला प्रतिबंधक सुरक्षितता उपाय म्हणजे घरी राहणे आणि शारिरीक अंतर जोपासणे हा आहे. या संकाटाने अनेक व्यवस्थांच्या व्यवस्थापनात्मक चौकटी बदलल्या आहेत. यातील एक म्हणजे शैक्षणिक क्षेत्र. यंदाच्या वर्षी महाविद्यालयीन पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा या विलंबाने होणार आहेत. माझ्या मते या संकटाने आपल्याला विद्यार्थ्यांसाठीच्या परीक्षा पद्धती नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या आधारे घेण्याची गरज निर्माण केली आहे. हे करत असताना आजचा महाविद्यालयीन विद्यार्थी हा परीक्षार्थी न राहता संशोधक विद्यार्थी म्हणून नावारूपास यावा हा विचार करुन पुढील उपाययोजनांचा विचार करणे आवश्यक आहे.
०१. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून संशोधन पुस्तिका तयार होणे – यामध्ये अकृषी विद्यापीठांत-महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी हा संशोधक विद्यार्थी म्हणून नावारूपास येण्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थी संशोधन पुस्तिकेचे निर्मिती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक प्राध्यापकांनी संशोधनाविषयी मार्गदर्शन करून सदर पुस्तिकेचे विद्यापीठाकडून मानांकन व्हावे विद्यार्थी संशोधन पुस्तिकेचा वापर हा शासन स्तरावरील धोरण निर्मिती व निश्चितीसाठी सहाय्यकारी घटक म्हणून करण्यात यावा.
०२. टास्क ओरिएंटेड एक्झाम सिस्टमचा अंमल करणे – यामध्ये कार्यभिमुख परीक्षा प्रणालीचा वापर होऊन वर्तमानकालीन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे धोरण निर्मिती व धोरण निश्चितीसाठी कसे परिपूर्ण होतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये आपणाला “चॉइस बेस्ड टास्क सिस्टम” चा वापर करून विद्यार्थ्याला तो शिकत असणाऱ्या अभ्यासशाखेआधारे कार्यपद्धत निवडण्याची मुभा प्राप्त व्हावी. सदर अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठस्तरीय विविध विषयांचा अभ्यास शाखांचा वापर होऊन विद्यार्थ्याने आपल्या आकलनाद्वारे कार्यपद्धती अंमल करणे गरजेचे आहे. याचाच दुसरा भाग म्हणजे विद्यार्थ्यांना कार्यपद्धती पूर्ण करताना स्वातंत्र्य देण्यात यावे, म्हणजे उदाहरणार्थ जर शिवाजी विद्यापीठाचा पदवी घेणारा विद्यार्थी राज्यशास्त्र विषयासंबंधी आपले संशोधनपर कार्य मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या अभ्यासक्रमाशी संलग्नित होऊन करणार असेल तर त्यास मुभा देण्यात यावी.
०३. लिंक बेस्ड क्वेशन बँक सिस्टम आणि क्विक रिझल्ट प्रणालीचा अवलंब करणे – या प्रणालीद्वारे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सर्व विद्यापीठांनी पदवी स्तरासाठी 50 गुण, पदव्युत्तर पदवीसाठी 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्नावली परीक्षा ही लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ई-मेल अथवा व्हाट्सअप नंबर वर ती पाठवून मर्यादित वेळेत ही परीक्षा घेऊन याचा निकाल तात्काळ जाहीर करावा.
०४. स्टुडंट रिसर्च ओरिएंटेशन ट्रेनिंग प्रोग्रामच्या अंमलबजावणीद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देणे – म्हणजेच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी लिंक तयार करून यासाठी यासाठी वेळ वेळ निश्चित करून पीआरएन नंबर आणि ओटीपी देऊन प्रश्नावली सोडविण्यास संदर्भात सूचित करावे. सर्व विद्यापीठांच्या महाविद्यालयांनी परीक्षा घेताना एक्झाम पोर्टलची निर्मिती करावी. यानुसार परीक्षांचे नियंत्रण व नियोजन करण्यात यावे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या या ऑनलाईन परीक्षेमुळे गुणदान करणे व त्वरित निकाल जाहीर करणे सोपे होऊन एकत्रित निकाल विद्यापीठास पाठविण्यात येणं सुलभ होईल.
०५. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याला महाविद्यालय प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शन होऊन त्याच्या संशोधनपर जाणिवांचा विकास होण्यासाठी महाविद्यालयीन ‘संशोधक विद्यार्थी अभ्यास गट’ स्थापन होणे गरजेचे आहे. – यामध्ये प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी पदवी व पदव्युत्तर रिसर्च ओरिएंटेड प्रोग्रामच्या प्रशिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना संशोधन पद्धती काय असते? संशोधन कशा पद्धतीने करावे? संशोधनात नाविन्यता कशी येईल? यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. म्हणजेच प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेटिव्ह अॕप्लायड रिसोर्सेसचा वापर करून प्रशिक्षण देणे यात अभिप्रेत आहे. पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना शब्दमर्यादा संशोधन पद्धती या संशोधनामध्ये काय गोष्टी अपेक्षित आहेत. अभ्यासक्रमांतून संशोधनासाठी काय करता येईल आणि अभ्यासक्रमातील घटकांचा धोरण निश्चिती व निर्मितीसाठी कसा वापर करता येईल यासाठी प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रशिक्षित करत असताना आपण करत असलेले संशोधन हे शासन-प्रशासन स्तरावर कसे फायद्याचे ठरेल आणि आपल्या संकल्पना या किती ताकदीच्या असाव्यात यासाठी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. या संशोधनामध्ये वाड़्मयचौर्यता नसावी. केलेले संशोधन हे किती मार्गदर्शक ठरेल याची तयारी लेखणीतून होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे गरजेचे आहे.
वर उल्लेख केलेल्या पद्धती ही पारंपरिक पद्धतीला पर्याय नक्कीच होऊ शकतात. थोडक्यात वर्तमानकालीन नावीन्यपूर्ण संकल्पना आणि दूरगामी उपाययोजना असंच या संकल्पनेबाबत म्हणता येईल.
०१. परंपरागत परीक्षा पद्धतीला टास्क ओरिएंटेड एक्झाम सिस्टम हा एक सकारात्मक पर्याय आहे.
०२. विद्यार्थ्यांना संशोधक होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण होय.
०३. शासन-प्रशासन आणि राजकारण या क्षेत्रातील धोरण निश्चिती आणि निर्मितीच्या अंमलबजावणीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे.
०४.आजचे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी हे टेक्नोसॅव्ही म्हणजेच तंत्रज्ञान जाणकार असून परंपरागत परीक्षापद्धती ऐवजी त्यांच्या संशोधनपर जाणिवांचा विकास होण्यासाठी टेक्नोसॅव्ही रिसर्चर तयार करणारी ही पद्धती आहे.
०५. आपण काय शिकलो, याऐवजी का आणि कशासाठी शिकतोय या शिक्षणाचा उपयोजन आणि सर्जनशीलतेसाठी कशा पद्धतीने वापर करण्यात येतोय याची माहिती विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संकल्पनेतून देनं गरजेचे आहे.
०६. विद्यापीठांनी कालबाह्य अभ्यासक्रमांना पूर्णतः बंद करून नाविन्यता असलेल्या अभ्यासक्रमांचा अंमल करणे गरजेचे आहे.
०७. परीक्षा नुसत्या पात्रतेच्या धनी न होता क्षमतेच्या सारथी व्हाव्यात. यातून विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास होणे आवश्यक आहे.
०८. महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थिनींना महाविद्यालय स्तरावरूनच नीतिमूल्यांचं शिक्षण मिळालं तर त्यांच्या वैचारिक क्षमता अधिक प्रगल्भ होऊन ते एक जबाबदार आणि सुजाण नागरिक होतील.
०९. पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना फक्त परीक्षापद्धतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या नवसंकल्पना, संशोधन अभ्यास पद्धतीद्वारे व्यापक आणि भविष्यासाठी कालसुसंगत बनवणे हे वर्तमान परिस्थितीत गरजेचं बनलं आहे. यासाठीच कालबाह्य अभ्यासक्रम किंवा परंपरागत परीक्षा पद्धतीचा टप्प्याटप्प्याने ऱ्हास होऊन नावीन्यपूर्ण संकल्पनेला संधी देणे गरजेचे आहे.
विशेष विनंती – महाराष्ट्रातील बहुतांशी महाविद्यालयात इंटरनेटची सुविधा किंवा वेबसाईट नसली तरी या व्यवस्था उभ्या करणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने या नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा सौजन्यपूर्ण विचार करून या नवीन बदलासाठी मी आणि माझ्यासारख्या इतर सहकार्यांना केव्हाही मदतीची हाक द्यावी.
महत्त्वाचे निवेदन –
वरील सर्व उपाययोजनांसंदर्भात अनेकांची सहमती किंवा असहमती असू शकते. माझ्या आकलनानुसार शैक्षणिक बदलांचा विचार करून या वर्तमानकालीन उपाययोजना महाराष्ट्र व भारतातील तमाम शैक्षणिक संस्थांसाठी मी विचाराधीन ठेवल्या आहेत. आपल्या मतमतांतरांचंही स्वागतच आहे. खाली दिलेल्या ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरवर आपल्या सूचना कळवाव्यात. आपल्या सर्व सूचनांचं स्वागतच..!!
अमीर सलीम इनामदार
लोणंद, जि सातारा
मोबा – 8999270633
ई-मेल – amirinamdar05@gmail.com
– profamir2131@gmail.com
लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जीवनकौशल्ये आणि बदलत्या अभ्यास पद्धतींचा चिकित्सक अभ्यास करतात.