हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून खडाजंगी पाहायला मिळाली. विधानपरिषद सभागृहात सभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना अक्षरशः झापले. मंत्री तुम्ही तुमच्या घरी, सभागृहात बोलण्याची हि पद्धत नाही असं म्हणत त्यांनी गुलाबराव पाटील यांना फटकारले.
नेमकं काय घडलं?
शिक्षकांच्या बाबतीत निर्णय झालेला असतानाही त्याबाबतचा निधी थांबवल्यावरून सत्ताधारी विरोधकांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी ज्या प्रकारे सभागृहात भाषण केलं, त्यावरुन नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप नोंदवला. गुलाबराव पाटील, मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, खाली बसा आधी ताबडतोब. ही कुठली पद्धत आहे सभागृहात वागायची. चौकात आहात का तुम्ही?, अशी ताकीद दिली. यानंतर गुलाबराव पाटील यांनी मी मंत्री आहे असं उलट उत्तर दिले त्यावर नीलम गोऱ्हे चांगल्याच भडकल्या, मंत्री तुम्ही घरी, आधी खाली बसा. हे सभागृह आहे अशा शब्दात त्यांनी गुलाबरावांना झापलं .
यावेळी संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही? असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी केल्यानंतर संसदीय कार्यमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करत हस्तक्षेप केला. तसेच सभागृहातील सदस्यांना विनंती करत खाली बसण्याचे आवाहन केले.