थर्ड अँगल । गेल्या ८-९ महिन्यांपासून जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे , त्यात भारतासारखा विकसनशील आणि अतिजास्त लोकसंख्येचा देश सुटणार तरी कसा..? भारतात कोरोना रुग्णांची संख्या आज ३० लाख पार गेलीये आणि मृत्यू झालेत ५२००० वर अधिक..
मधल्या काळात माझ्या अनेक मित्रांनी कमलेश , “व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीयेत , बेड मिळत नाहीयेत , आईला-नातेवाईकांना ऍडमिट करायचं आहे , कुठे ओळखीने करता येईल का..” इ. साठी अनेक कॉल केले आणि शक्य तितकी मदत करायचा मी देखील प्रयत्न केला..!
पण एकूणच रुग्णालयात जाताना नकारात्मक दृष्टीने जायचं असं प्रमाण मला त्यांच्यामध्ये दिसलं… डॉक्टर लूट करतात वगैरे नाराजीचा सूर मला अनेकांत जाणवला त्यामुळे हा लेख लिहिण्याचा प्रपंच..!
खरं तर दवाखान्यात फीस स्ट्रक्चर कसं असावं , हा हॉस्पिटल प्रशासनाचा अधिकार आहे. आपण त्या हॉस्पिटलमध्ये जायचं की नाही हे ज्याने त्याने ठरवावं. कोणतंही रुग्णालय आमच्याइथेचं भरती व्हा, असा आग्रह करत नाही आणि कायद्याने दिलेल्या चौकटीत राहून जास्तीत जास्त दवाखान्यामध्ये कमीत कमी फी आकारली जाते , हा माझा स्व-अनुभव आहे.
एकतर कोरोना सारख्या महामारीच्या काळात डॉक्टर स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णाला सेवा द्यायचा प्रयत्न करत आहेत , पण मुळातचं नकारात्मक मानसिकतेने दवाखान्यात प्रवेश केल्यावर डॉक्टर आपल्याला चांगली सेवा देत असतील असा विचार रुग्णांच्या मनात येणं अशक्यच..!
त्यामुळेच त्यांनी हे इंजेक्शन द्यायला हवं होतं , पण ते दिलं नाही. सलाईन लावायची काही आवश्यकता नव्हती तरी पण उगीचं बिल वाढवण्यासाठी सलाईन लावतात, असा सूर ऐकायला मिळतो. तुम्हाला जर इतकं ज्ञान असेल तर घरीचं का भरती करत नाहीत..??
झालंय कसं , गुगल केलं , त्यावर प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर मिळालं की सर्वांना वाटतं, आपण १० मिनिटांत डॉक्टर झालो किंव्हा तज्ञ झालो… आपल्याला १० मिनिटांत सगळं समजायला लागलं, पण वास्तविकतेमध्ये तसं नसतं.. वॉशिंग मशीन च्या साहाय्याने एखादा इंजिनिअर-रँचो’ फिल्म मध्येच डिलिव्हरी करू शकतो , प्रत्यक्षात ते शक्य नसतं , हे कोण समजून घेणार..??
डॉक्टरांनी कोणते इंजेक्शन द्यावे , कोणती औषधे द्यावीत हे त्यांना ठरवू द्या ना. आपण त्या क्षेत्रातील तज्ञ असल्या सारखं उगीचं का वागावं..? डॉक्टर एका मिनिटाच्या तपासणीसाठी ५००-१००० रु फिस आकारतात , अशीही तक्रार नेहमीचं ऐकायला मिळत असते. अहो पण त्या आजाराचं एका मिनिटात निदान होण्यासाठी त्या डॉक्टरांनी बारावी नंतर १२-१५ वर्षे अभ्यास केलेला असतो , त्याच काय ??
असं उगीचं कोणालाही बसवलं आणि एका मिनिटात आजाराचं निदान केलं , असं होईल का ?? कंपाऊनडर आणि डॉक्टर यात कोणाला जास्त कळतं , यात मी जाणार नाही, ते सर्वज्ञात आहे..!
उसेन बोल्टला, ऑलिम्पिकवर १० सेकंद पळण्यासाठी पन्नास करोड भेटत असतील , पण त्या दहा सेकंदात १०० मीटर धावण्यासाठी तो चार वर्षे दिवस रात्र पळण्याचा सराव करत असतो, हा विचार माणसाच्या मनात येत नाही का..??
मी शासकीय महाविद्यालयात शिक्षण घेतलेले असल्याने आमच्या धर्मार्थ रुग्णालयात डिलिव्हरी ची फी होती फक्त १२०० रुपये , ते १२०० रुपये देताना सुद्धा पेशंटची गरिबी आड येताना मी पाहिली आहे. मग ते मूल राहू द्या तुमच्याकडेच, आमच्याकडून काय पैशांची व्यवस्था होणार नाहीये असं ऐकायला मिळायचं..!
इंटर्न किंवा एमडी करणारे डॉक्टर बिचारे कॉन्ट्री करून स्वखर्चाने बिल अदा करून पेशंटला डिस्चार्ज देताना मी कित्येकदा पाहिलंय… उगीचं त्या बाळाला काही झालं तर , त्या नातेवाईकांच्या हाताने कोण मार खाईल, अशी डॉक्टरांची अवस्था..!
हॉटेलात जाताना , चित्रपट गृहात जाताना , मॉल मध्ये जाताना आपण या सगळ्याचा , आपल्याला लुटलं जात आहे याचा एवढा विचार करतो का..?? तर नक्कीच नाही..!
तिथे निमूटपणे ५ रुपयांच्या लाह्या पॉपकॉर्न म्हणून १५० रुपयांना घ्यायच्या.. घरच्या १००-२०० रुपयांच्या नॉनव्हेज साठी हॉटेलमध्ये दीड-दोन हजार रुपये मोजायचे.. हॉटेलमध्ये डीलक्स रूम साठी एका रात्रीचे ५-७ हजार रुपये द्यायचे , तिथे एका शब्दाने एवढे बिल कसे काय , असा जाब विचायरायची आपण हिंमत दाखवतो का ?? याउलट सर्व्हिस खूप छान दिली वगैरे म्हणून वेटर ला ५०-१०० रुपयांची टीप देताना मी कित्येक मित्रांना पहिलंय..!
हॉटेलात ५० रुपयांच्या पिझ्झासाठी एकीकडे ९००-१००० रुपये मोजायचे , गावरान चुलीवरचे मटण-भाकरी खाण्यासाठी दोन-तीन हजार रुपये मोजायचे पण दवाखान्यात गेल्यावर एक एक रुपयांचा हिशोब लावायचा प्रयत्न करायचा , एवढी हिप्पोक्रसी येते तरी कुठून..??
खरं तर खाजगी रुग्णालये चालवण्यासाठी प्रचंड खर्च येत असतो.. बरं त्यासाठी सरकार काही अनुदान देत असते, असंही काही नाही.. बऱ्यापैकी डॉक्टर्स हे मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेले असतात, त्यामुळे कोटीच्या कोटी रुपयांची कर्जे काढून हॉस्पिटल सुरू करायचे. रुग्णांना चांगली सुविधा मिळावी म्हणून त्यासाठी अति महागडी मशिन्स घ्यायची. पुन्हा हॉस्पिटलमध्ये असलेला नर्स , वॉर्ड बॉय , रेसेप्शन डेस्कचा स्टाफ हे सगळं यांचा खर्च , हॉस्पिटलचा दररोजच्या देखभालीचा खर्च. हे सगळं सांभाळून दिवस रात्र २४ तास रुग्णांना सेवा द्यावी लागते.. हा विचार सामान्य नागरिकांनी कधी केलाय का ??
बरं सेवा देत असताना हजार पेशंटचे प्राण वाचवले तर त्यात काही नवल नाही, कौतुक नाही, कारण ते त्यांचं कामच आहे… पण मग हे सगळं करत असताना एखाद्या क्रिटिकल पेशंटचा मृत्यू झाला तर लगेच नातेवाईकांनी येऊन तोड फोड , मारहाण करायची हे किती योग्य आहे ??
बरं डॉक्टर सेवा देतात, ते त्यांचं कामचं आहे, असं असेल तर त्या सेवेच्या मोबदल्यात डॉक्टरांच्या मुलांच्या शाळेची फीस कोणी माफ करत का..?? मेडिकल कॉलेज मध्ये त्यांच्या मुलांना काही कन्सेसन देण्यात येत का ?? ते डॉक्टर कमी पैशात उपचार करतात म्हणून त्यांना किराणा दुकानात स्वस्तात किराणा द्यावं , असं कुठे पाहण्यात आलंय का ??
आणि तसंचं असेल तर मग फक्त डॉक्टरांनीचं सेवा का द्यायची ?? वकील , इंजिनिअर , शिक्षक इतर प्रोफेशनच्या लोकांनी कमीत कमी फीस मध्ये सेवा द्यायला नको का ??
खाजगी कोचिंग क्लासच्या फीस किती वाढल्या आहेत , हे सांगावं लागेल का ? बहुराष्ट्र कंपनी मध्ये काम करणारे अभियंता दीड दोन लाख पगार घेतात, त्यावर कोणी बोलेल का ?? तर नाही, हेच उत्तर आहे.. कारण ते त्यांच्या ज्ञानाचे पैसे व त्याचा पगार घेत असतात.
सध्या गाजलेल्या सुशांतसिंग च्या केसमध्ये एक नामांकित वकील एका सुनावणीचे १० लाख रुपये घेतोय म्हणे..! या सगळ्यात चुकीचं असं काही मला तरी वाटत नाही , कारण ते त्यांच्या ज्ञानाचे-मेहनतीचे पैसे असतात.. पण हाचं विचार डॉक्टर या प्रोफेशन बद्दल सर्वांनी केला तर काय बिघडतं..??
सर्व क्षेत्रात जसे काही अपवाद आहेत, तसं काही डॉक्टर्स लूटत पण असतील , पण सरसगट सगळ्याच (म्हणजे जास्तीत जास्त) हॉस्पिटलमध्ये लूट चालते , हे बोलताना आपण किती विचार करतो..??
कोरोनाच्या काळात डॉक्टर लोकांना सोसायटीत फ्लॅट भाड्याने देऊ नका , अशा नोटिसा सोसायटी वाल्यांनी काढल्यात..कारण काय तर त्यांच्या मुळे आपल्या जीवाला धोका आहे. मग तेच डॉक्टर १२-१२ तास PPE किट घालून , स्वतःचा जीव धोक्यात घालून आपला जीव वाचवण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत हे आपल्याला दिसत नाही का ?? माझी एक मैत्रीण मुंबईच्या नायर रुग्णालयात ७-८ तास ड्युटी करते, ते ही रात्री ८ ते पहाटे ४ , कायम कोरोना पेशंटशी संबंध येतो , कधी स्वतःची टेस्ट पोसिटीव्ह येईल सांगता येत नाही , एवढी ही रिस्क. आपल्याला साधा मास्क लावून २० मिनिटे राहणं आपल्याला होत नाही , ही वस्तुस्थिती..!
सत्यमेव_जयते सारख्या कार्यक्रमात त्या अमीर भाऊने डॉक्टर म्हणजे फक्त लुटा लूट करणारे , व्हेंटिलेटर म्हणजे लूट करणारी मशीन अशी प्रतिमा करून ठेवायचा प्रयत्न केला.. पण तो स्वतः कसा एका चित्रपटासाठी जास्त फीस घेतो , तो कसा २०-२५ कोटी घेतो , ह्या चर्चा आपण चार चौघात ऐकतो आणि त्याचं कौतुक करतो , कसं आहे दुसऱ्यावर बोट ठेवणं खूप सोपं असतं.. आपण स्वतः काय करतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं.. दुसऱ्याला अक्कल शिकवण्या आधी आपण २ तासाच्या चित्रपटासाठी कोटीच्या कोटी रुपये का घेतो , याचं उत्तर त्यांनी कधी दिलंय का..??
कोरोनाच्या सुरवातीच्या काळात शेतकऱ्यांकडून मेथीची भाजी ४५-५० रुपयांना मी स्वतः घेतली , कांद्याचं किंवा साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होणार असेल तर व्यापारी वर्ग साठेबाजी करून पुढे ते जास्त किंमतीत विकताना आपण बघत नाही का..??
कसं आहे , डॉक्टर वर्गाला टार्गेट करणं खूप सोपं झालंय.. एक तर डॉक्टर म्हणजे सर्वात नोबेल प्रोफेशन पैकी एक, त्यामुळे ते इतर कोणाचं नुकसान करतील याची शक्यता खूपचं कमी.. म्हणून दीड-दोन लाख रुपये बिल आलं का , ते देण्याऐवजी सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना बोलवायचं , लोकल एक दोन राजकीय कार्यकर्ते गोळा करायचे, त्यांना ५० हजार-एक लाख रुपये द्यायचे मग ते जाऊन दवाखान्याची तोडफोड करणार , डॉक्टरांना धमकी देणार , Bill द्यायला नकार देणार.. अशा पध्दतीने एखाद्या लाखात सेटलमेंट करून घ्यायची, याच प्रमाण देखील वाढलं आहे , असा अनुभव माझ्या अनेक मित्रांना जे प्रॅक्टिस करत आहेत त्यांना दैनंदिन आयुष्यात येतोय.. पण हे करत असताना लोकांनी हे ही लक्षात ठेवावं की , आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव वाचवायला डॉक्टरचं येणार आहेत , ना की कार्यकर्ते..!
चौकात हेल्मेट न घालता, पियुसी नसताना , सिग्नल तोडला आणि पोलिसांनी पकडलं की २००० ची रीतसर पावती फाडण्याऐवजी २०० ची नोट देणारे पण आपणचं असतो आणि नंतर ते पोलिस लोकं खूप भ्रष्टाचार करतात , हे म्हणणारे पण आपणचं..!
डॉक्टर , इंजिनिअर , शिक्षक , पोलिस किंवा वकील काय हे सर्व समाजाचे घटक असतात, समाजाचं ते प्रतिनिधित्व करत असतात, जसा समाज तसा व्यक्ती घडत असतो..!
त्यामुळे या प्रत्येकाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघूनचं समाजाने तशी वागणूक त्यांना द्यावी , एवढीचं माझी माफक अपेक्षा..!
– डॉ.कमलेश विलास जऱ्हाड.
( स.कक्ष अधिकारी, मंत्रालय, मुंबई )