सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
आमच्या तीन पिढयांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला केव्हाही मतदान दिलेले नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माझ्या भेटीचा फोटो व्हायलर करुन समाधान मिळवणाऱ्यांनी आमच्यावर शंका उपस्थित करु नये. आमच्या निष्ठेची उंची मोजणारी फुटपट्टी जन्माला यायची आहे. ज्यांच्या तीन पिढ्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला विरोध केला त्यांनाच माझ्यावर आरोप करण्याचा अधिकार आहे. ज्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी राजकीय तडजोड करण्याची वेळ येईल. त्यावेळी मी राजकारणातून संन्यास घेऊन घरी बसेन अशी स्पष्टोक्ती सदाभाऊ खोत यांनी दिली.
सदाभाऊ खोत म्हणाले, गेल्या आठवड्यात सभागृहात जाताना माझी व जयंत पाटलांची भेट झाली. या भेटी दरम्यान औपचारिकता म्हणून आम्ही दोघे एका विषयावर बोलत होतो. त्यावेळी त्याचे छायाचित्र घेऊन ते सोशल मिडियावर व्हायलर करण्यात आले. यात सोशल मिडीयावर माझ्या विषयी अफवा पसरवणे सुरु केले. पण ज्यांना माझ्या विषयी शंका वाटते. त्यांनी हे लक्षात ठेवावे. आमच्या वडिलांनी, मी व मुलांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीला विरोध केला आहे व करत राहणार. मात्र ज्यांनी राष्ट्रवादीला यापूर्वी मतदान केले आहे.
अथवा ज्यांनी गळ्यात गळा घातला आहे. त्यांनी माझे फोटो व्हायलर करुन स्वतःला गुदगुल्या करुन घेऊ नये. इस्लामपूर विधानसभा मतदार संघात आम्ही पारंपारिक विरोधक एकत्रीत बसून एका विचाराने उमेदवारीचा निर्णय घेऊ. सर्वांची मोट बांधणाऱ्या नानासाहेब महाडिकांची उणीव असली तरी आता सामुहिक नेतृत्व पुढे करुन मुख्यमंत्री व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करुन इस्लामपूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार देणार आहे. ते ठरवतील तो उमेदवार अंतिम मान्य करून एकजुटीने विधानसभेच्या तयारीला लागू. इस्लामपूर मतदारसंघ आम्हाला सोडला तरीही चर्चेअंती उमेदवार ठरवला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.