देशात मागील २४ तासांत ३४,८८४ नवे कोरोनाग्रस्त आढळले; ६७१ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घाट होताना दिसत नाही आहे. दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण वेगानं वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांमध्ये ३४ हजार ८८४ नव्या रुणांची नोंद झाली. ६ लाख ५३ हजार ७५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून गेल्या २४ तासांमध्ये २२ हजार ९४२ रुग्ण बरे झाले. बरे होण्याचे प्रमाण ६३.३३ टक्के झाले आहे. देशात २४ तासांमध्ये ६७१ रुग्णांचा मृत्यू झाला.

दरम्यान, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १० लाख ३८ हजार ७१६ वर पोहचला आहे. केवळ मागील २० दिवसांमध्ये तब्बल ५ लाख कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. देशात २९ फेब्रुवारीला पहिला रुग्ण आढळल्यानंतर रुग्णसंख्या ५ लाखांवर जाण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी लागला. २६ जूनला ५ लाख असलेली बाधितांची संख्या शुक्रवारी १० लाखांच्या पुढे गेली. म्हणजेच देशात अवघ्या २० दिवसांत दुप्पट रुग्णवाढ झाली. देशात आतापर्यंत करोनामुळे २६ हजार २७३ जणांचा मृत्यू झाला आहे तर अद्याप ३ लाख ५८ हजार ६९२ जणांवर उपचार सुरू आहेत.

देशातील एकूण कोरोनाबाधितांचे प्रमाण हे जगाच्या सरासरीपेक्षा ४ ते ८ पटीने कमी आहे. एकूण ३ लाख ४२ हजार ७५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १० लाखांमागे १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून हे प्रमाण जगात सर्वात कमी आहे. लक्षणे नसलेल्या वा सौम्य लक्षणे असलेल्या ८० टक्के रुग्णांचे होम क्वारंटाईन केले जात आहे. त्यांच्यावर सातत्याने देखरेखही ठेवली जात आहे. एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी १.९४ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. ०.३५ टक्के रुग्णांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले असून २.८१ टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment