हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या रेल्वे नेटवर्कने सध्या देशभरात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची सेवा पुरवली आहे. या नेटवर्कच्या विस्ताराने सामान्य नागरिकांच्या प्रवासाला सोयीस्कर बनवले आहे. मात्र, काही भाग आजही रेल्वे नेटवर्कपासून दूर आहेत. त्यातच महाराष्ट्रातील मराठवाडा क्षेत्राला एक मोठा दिलासा मिळालेला आहे. राज्यात एक नवा रेल्वे मार्ग सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यातील तीन जिल्हे – धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर – एकत्र जोडणारा हा रेल्वे मार्ग त्यांचे सामाजिक आणि आर्थिक विकास सुनिश्चित करणार आहे.
नवीन रेल्वे मार्गाची घोषणा –
सध्या बीड आणि धाराशिवकडे छत्रपती संभाजीनगरकडे रेल्वेने जाता येत नाही. यासाठी रस्ते मार्गाशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. यामुळे अनेक वर्षांपासून बीड आणि धाराशिवला छत्रपती संभाजीनगरसोबत रेल्वे नेटवर्क जोडण्याची मागणी करण्यात येत होती. 2022 मध्ये या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले होते. त्यानंतर नागरिकांना या रेल्वे मार्गाच्या लवकर उद्घाटनाची आशा होती. मात्र, सर्वेक्षणानंतर त्याबाबत अधिकृत प्रगती दिसून आलेली नाही. पण बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी या प्रकल्पासाठी सतत पाठपुरावा केला.
मराठवाड्यातील या तीन जिल्ह्यांचा विकास –
नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार सोनवणे यांना एक पत्र पाठवून या रेल्वे मार्गाच्या मंजुरीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पत्रात रेल्वेमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या मार्गाच्या तपासणीचे आदेश दिले असल्याचे सांगितले. यामुळे या प्रकल्पासंबंधी चर्चा पुन्हा सुरू झाल्या असून, या मार्गाच्या कागदावर असलेल्या योजनांना लवकरच मूर्त रूप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे मराठवाड्यातील या तीन जिल्ह्यांचा विकास होईल आणि त्याचबरोबर नागरिकांना रेल्वे सेवा मिळवून दिली जाईल.