औरंगाबाद – औरंगाबादकरांची तहान भागवण्यासाठी 1680 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम थांबू नये यासाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली आहे. यामुळे ही योजना 2023-24 पर्यंत रखडणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.
मनपा प्रशासन आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले की, समांतर जलवाहिनीस आलेला निधी पडून होता. या निधीतून पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निधी दिला जात आहे. आतापर्यंत 76 कोटी रुपये देण्यात आले आहेत. शासनाने या योजनेसाठी आर्थिक तरतूद केली. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी आर्थिक पेच निर्माण होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
ही पाणी पुरवठा योजना केंद्र सरकारच्या अमृत-2 मधून पूर्ण करावी असा प्रयत्न देखील सुरू आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करेल. अमृत-2 मधून ही योजना मंजूर झाली, तर राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीतून या योजनेचे काम होऊ शकेल. पाणीपुरवठा योजनेसाठी भविष्यात आर्थिक समस्या निर्माण होणार नाही, असेही ते म्हणाले.