हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंगळवारी दिल्ली पोलिसांकडून न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि HR प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभर पोलिसांनी न्यूजक्लिक आणि संबंधित पत्रकारांची चौकशी करुन 30 परिसरांवर छापे टाकले होती. या चौकशीअंती रात्री पोलिसांनी प्रबीर पुरकायस्थ यांना ताब्यात घेतले आहे. तसेच न्यूजक्लिकचे दिल्लीतील मुख्य कार्यालय सील करून टाकले आहे. आज प्रबीर पुरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती यांना 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविण्यात येणार आहे.
न्यूजक्लिक या पोर्टलवर आर्थिक निधी घेऊन चीनच्या धोरणांचा प्रचार करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मंगळवारी सकाळी पोलिसांनी न्यूजक्लिक संबंधित पत्रकारांची चौकशी करण्यास आणि तसेच न्यूजक्लिकशी जोडलेल्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली होती. यानंतर प्रबीर पुरकायस्थ यांना न्यूजक्लिकच्या दक्षिण दिल्लीतील कार्यालयात घेऊन जाण्यात आले. तिथे त्यांची चौकशी करण्यात आली. तसेच पत्रकारांची देखील चौकशी प्रक्रिया पार पडली. ही चौकशी झाल्यानंतर पोलीसांनी प्रबीर पुरकायस्थ आणि अमित चक्रवर्ती यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, 2009 मध्ये संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांनी न्यूजक्लिकची स्थापना केली होती. तेव्हापासून न्यूजक्लिपची ओळख केंद्र सरकारवर टीका करणारे पोर्टल अशी निर्माण झाली. गेल्या काही काळापूर्वी याच पोर्टलवर चीनकडून निधी घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच, न्यूजक्लिकला अमेरिकन अब्जाधीश कादंबरी रॉय सिंघम यांनी वित्तपुरवठा केल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले होते. यामध्ये चीनचा प्रचार करण्यासाठी भारतासह जगातील अनेक संस्थांना निधी देण्यात येतो असेही म्हणले होते.
याप्रकरणी करण्यात आलेल्या ईडीच्या तपासात आढळून आले होते की, चीनमधून पाठवण्यात आलेला निधी काही परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून न्यूजक्लिकपर्यंत पोहोचला आला. यानंतर या निधीचे वाटप न्यूजक्लिकशी संबंधित पत्रकारांमध्ये करण्यात आले. मुख्य म्हणजे, त्यावेळी ईडीच्या तपासात 38.5 कोटी रुपयांचे बनावट विदेशी फंड व्यवहार उघड झाले होते. त्यानंतर, 2021 मध्ये न्यूजक्लिकला मिळालेल्या बेकायदेशीर निधीबाबत आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. मात्र याप्रकरणी हायकोर्टाने न्यूजक्लिकच्या प्रवर्तकांना अटकेपासून दिलासा दिला होता.