हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)) यांनी अजित पवार गटाला (Ajit Pawar) एक मोठा धक्का दिला आहे. आज निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. आज निलेश लंकेंची शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासह पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्येच शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते निलेश लंकेंच्या कोविड पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना, “मी शरद पवार यांच्या विचारधारेवरच चालतो” असे निलेश लंके यांनी म्हटले. परंतु त्यांनी अद्याप शरद पवार यांच्या गटात प्रवेश केल्याचे सांगितलेले नाही. त्यामुळे लंकेचे नेमके काय चालले आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
खरे तर, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू आहेत. अशातच निलेश लंके यांनी अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अजित पवार यांच्याकडून देखील निलेश लंकेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु अजित पवारांचे हे प्रयत्न आता फसलेले दिसत आहेत. कारण आज स्वतः निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेत आपण शरद पवार यांच्याच विचारांवर चालणार असल्याचे जाहीर केले आहे.
महत्वाचे म्हणजे, निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु महायुतीत जागा वाटपावरून सुरू झालेल्या वादामुळे त्यांची निराशा झाली आहे. महायुतीच्या जागावाटपात पवारांच्या हाती फक्त तीन ते सहा जागा येणार असल्याच्या चर्चेमुळे निलेश लंकेंनी अजित पवार गटातून बाहेर पडण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून आज निलेश लंके यांनी पुण्यातील कार्यालयात शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीच्या बाजूने निलेश लंके नगरमधून उभे राहतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.