पुण्यात मनसेला खिंडार; तब्बल 400 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी पुणे महापालिका निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यात मोठा झटका बसला आहे. मनसेच्या पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्यासह तब्बल 400 पदाधिकाऱ्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. निलेश माझीरे हे वसंत मोरे यांचे जवळचे समजले जातात.

निलेश माझीरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर नाराज असलेल्या माझिरे यांनी पदाचा राजीनामा दिला. आता त्यांनी 400 कार्यकर्त्यांसह मनसेला जय महाराष्ट्र केल्याने ऐन महापालिकेच्या तोंडावर पक्षाला मोठा धक्का बसला आहे. निलेश माझिरे आता कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वसंत मोरेही नाराज ?

दरम्यान, वसंत मोरे गेल्या काही दिवसापासून मनसेत नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच पुण्यातील एका विवाह सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना थेट ऑफर दिली. “तात्या कधी येता… वाट पाहतोय,” असे म्हंटले. अजित पवारांच्या वक्तव्याला वसंत मोरे यांनी देखील दुजोरा दिला होता. त्यामुळे पुण्यात मनसेला आणखी हादरा बसणार का हे आगामी काळातच कळेल.