सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
ठाण्याचे तत्कालीन शिवसेनाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट सध्या सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांना मोफत दाखवणार असल्याची माहिती शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख निलेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिघे साहेबांच्या जीवन कार्याची ओळख आणि त्यांचे शिवसेनेच्या उभारणीत योगदान त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा याकरिता हा उपक्रम राबविणार असल्याचे मोरे यांनी यावेळी सांगितले.
सातारा येथे आज निलेश मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, झी टॉकीज निर्मित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा मोफत शो सेव्हन स्टार चित्रपटगृहातील स्क्रीन नंबर 2 येथे आयोजित केला आहे. या चित्रपटामध्ये आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओक या सुप्रसिद्ध अभिनेत्याने साकारली आहे. या चित्रपटगृहाची क्षमता 100 आसनांची असून दि. 13 रोजीचे सर्व 5 शो आरक्षित केले आहेत. या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई व ठाणे येथे हा चित्रपट उत्तम गर्दीत सुरू आहे. आनंद दिघे हे ठाण्याचे तत्कालीन जिल्हाप्रमुख होते. शिवसेनेसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वाहून घेतले होते. शिवसेनेचा प्रसार आणि प्रचार तसेच कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावर उतरून काम करावयाची तयारी याकरिता त्यांनी कधीच मागे पुढे पाहिले नाही. त्यांच्या जीवनशैलीचा परिचय व्हावा आणि शिवसेना कार्यकर्ता म्हणून त्यांचे पक्ष विस्तारातील कार्य काय होते. त्यांचे कार्य हे साताऱ्यातील शिवसैनिकांना समजावे आणि सर्वांना त्या पद्धतीने काम करण्याची प्रेरणा मिळावी या हेतूने या चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचेकडून करण्यात आले असल्याची माहिती शहरप्रमुख निलेश मोरे यांनी सांगितले.