साडेनऊ कोटींच्या निविदेत गडबड? निविदा प्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी

औरंगाबाद – राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाची दूध डेरी परिसरात साडेनऊ कोटी रुपयांतून इमारत बांधण्यात येणार आहे. यात कार्यालय आणि दोन निवासी क्वार्टर्सचा समावेश असून या कामासाठी मागवण्यात आलेल्या निविदेत गडबड असल्याचा आरोप कंत्राटदारांनी सुरू केला आहे. आज कंत्राटदारांचे शिष्टमंडळ बांधकाम विभागांच्या सचिवांची भेट घेऊन पुन्हा निविदा मागवण्याची मागणी करणार आहेत.

21 फेब्रुवारी रोजी निविदा घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे एका कंत्राटदाराने मुख्य अभियंत्यांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यानंतर तीन दिवसांनी साडेनऊ कोटींच्या निविदा वरून बांधकाम विभाग विरुद्ध कंत्राटदार असे चित्र निर्माण झाले आहे. हा सगळा प्रकार विभागातील कामकाजावर अविश्वास दर्शवणारा दिसतो. वर्क ऑर्डर देण्यापूर्वी या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी बांधकाम सचिवांना आज कंत्राटदार भेटून निवेदन देणार आहेत.

हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर, वंडर कन्स्ट्रक्शन्स, एन.के. कन्स्ट्रक्शन्स, ख्वाजा मिस्त्री, के.के. थोरात, के.एच. कन्स्ट्रक्शन, अमन कन्स्ट्रक्शन, निर्मिती कन्स्ट्रक्शन, स्टार कन्स्ट्रक्शन्स आदींचे टेंडर या कामासाठी आले होते.