इंदिरा जयसिंह यांच्या सल्ल्यावर निर्भयाच्या आईने सुनावले खडे बोल

0
30
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । निर्भयाच्या आईनं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं अनुकरण करून दोषींना माफ करावं, असा अजब सल्ला ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी आशा देवी यांना दिला होता. त्यावर आशादेवी चांगल्याच भडकल्या. तुमच्या सारख्यांमुळेच बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही. अशा शब्दांत निर्भयाच्या आईने इंदिरा जयसिंह यांना खडे बोल सुनावत राग व्यक्त केला आहे.

निर्भयाच्या दोषींना फाशीची शिक्षा देण्याच्या पार्श्वभूमीवर इंदिरा जयसिंह यांनी एक ट्विट केलं होतं. ‘निर्भयाच्या आईचं दु:ख आणि त्यांच्या वेदना मी समजू शकते. तरीही मी त्यांना सोनिया गांधी यांचं अनुकरण करायला सांगेन. सोनिया यांनी ज्याप्रमाणे त्यांचे पती राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील दोषी नलिनी हिला माफ केलं, त्याचप्रकारे निर्भयाच्या आईनेही दोषींना माफ करावं. आम्ही निर्भयाच्या आईसोबत आहोत, मात्र मृत्यूदंडाला आमचा विरोध आहे’, असं इंदिरा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं. इंदिरा यांच्या या ट्विटला निर्भयाच्या आईने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत निर्भयाच्या आई म्हणाल्या, “दोषींना माफ करण्याचा सल्ला देणाऱ्या इंदिरा जयसिंह आहेत तरी कोण? असा सल्ला देण्याची त्यांची हिंमतच कशी होते? संपूर्ण देश दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहे. यांच्यासारख्या लोकांमुळेच बलात्कार पीडितांना न्याय मिळत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये सर्वोच्च न्यायालयात इंदिरा यांच्याशी माझी अनेकदा भेट झाली. मी ठीक आहे का हेसुद्धा त्यांनी कधी मला विचारलं नाही आणि आता त्या दोषींची बाजू घेत आहेत. बलात्कार करणाऱ्या नराधमांची साथ देऊनच अशा लोकांचा उदरनिर्वाह होतो, त्यामुळे त्या घटना थांबत नाहीत.”असं आशा देवी म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here