हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना ३ मार्चला ला फासावर चढवण्यात येणार आहे. मात्र फाशीच्या भीतीने हत्या प्रकरणातल्या आरोपीनं डोकं भिंतीवर आपटून स्वत:ला जखमी करुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. विनय शर्मा या आरोपीने तिहार तुरुंगातल्या भिंतीवर डोकं आपटून घेतलं आहे. यानंतर तुरुंग प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं आणि रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. विनय शर्मा आपली फाशी पुढे ढकलावी यासाठी हे फाजील प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.
निर्भया सामूहिक बलात्कार व खून खटल्यात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या चारही खुन्यांना फाशी देण्यासाठी सत्र न्यायालयानं सोमवारी ३ मार्च ही नवी तारीख निश्चित केली आहे. त्यानुसार विनय कुमार शर्मासह मुकेश कुमार सिंग, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार यांना ३ मार्चला सकाळी ६ वाजता दिल्लीच्या तिहार कारागृहात फाशी दिली जाईल. सत्र न्यायालयानं फाशीची तारीख निश्चित केल्यापासून चारही दोषी अतिशय आक्रमक पद्धतीनं वागत आहेत.
दरम्यान विनय शर्माची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. मात्र तुरुंग प्रशासनानं त्यांचा हा दावा फेटाळून लावला. विनय शर्माच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याची कोणतीही लक्षणं दिसत नसल्याचं तुरुंग प्रशासनानं स्पष्ट केलं. विनयची मानसिक स्थिती उत्तम असून तो मानसोपचारतज्ज्ञांच्या उपचारांना व्यवस्थित प्रतिसाद देत असल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली.