हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यसभेच्या जागांपैकी सर्वात प्रतिष्ठेची होत असलेली लढत म्हणजे कोल्हापूरमधील भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक व शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्यातील होय. या उमेदवारांना मत देण्यासाठी दोन्ही पक्षांकडून फिल्डिंग लावली जात असताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन केले आहे. “शिवसेनेने आपली सेफ मते संजय पवारला द्यावीत. कारण पवार हे खरे शिवसैनिक आहे, असे आवाहन खुद्द राणे यांनी केले आहे. त्यामुळे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगली होऊ लागली आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मात्र, शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख व सध्याचे राज्यसभेचे उमेदवार संजय पवार याचे खूप कौतुक केले. यावेळी राणे म्हणाले की, शिवसेनेचे कट्टर समर्थक कोण असतील तर ते संजय पवार असून संजय राऊत नाही. संजय राऊत निर्लज्ज असून अशा संजय राऊतला शिवसेनेचे आमदार मत देतीला का? उलट सेफ मत संजय पवार यांना द्यावीत. आणि त्यानंतर राऊतला उर्वरित मत द्यावी, असे आवाहन राणे यांनी शिवसेना आमदारांना केले.
राऊतांचा केला लोमट्या असा उल्लेख
यावेळी नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, संजय राऊत बाहेरून आला आहे. संजय राऊत हा तर लोमटया आहे. त्याने मासाहेब आणि बाळासाहेब यांच्यात वाद असल्याचा लेख लिहिला होता. अशा संजय राऊतला शिवसेनेचे आमदार मत देतीला का? संजय राऊतला लीलावतीला पाठविण्याची वेळ आली आहे, अशी टीका राणे यांनी केली आहे.