हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या 48 दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. मुंबईतील लालबागनगरीत गणेशोत्सवाचा दरवर्षी वेगळाच थाट पहायला मिळतो. लालबागच्या राजाचे भक्त दूरवरून लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. अशाच लालबागच्या राजाच्या एका निस्सीम भक्ताला आज देवाज्ञा झाली आहे. दरवर्षी लालबागच्या राजाचा भव्य सेट साकारणाऱ्या नितीन देसाई यांच्या मृत्यूमुळे सिनेसृष्टीसह सर्वत्र शोककळा पसरली आहे. नितीन देसाई हे सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक होते. त्यांनी कर्जतमधील स्वतःच्याच एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांचा मृतदेह आज एनडी स्टुडिओमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आजतागायत त्यांनी अनेक मराठी, हिंदी सिनेमे तसेच मालिका, राजकीय नेत्यांच्या भाषण मेळाव्याचे सेट आणि पूर्ण श्रद्धेने लालबागच्या राजाचा दरबार दरवर्षी सजवला आहे. गतवर्षी त्यांनी ‘लालबागचा राजा’साठी राम मंदिराचा देखावा उभारला होता. तर यंदा देसाईंना ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा’ देखावा साकारायचा होता. तशी त्यांनी सुरुवात देखील केली होती. नव्वदाव्या वर्षीचे मंडप पूजन आणि सजावट देखील तेच करत होते. ज्याचे फोटो त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले होते.
पण आता हे काम अपूर्ण राहिले असून उत्सव तोंडावर असताना हे काम कोण पूर्ण करणार..? हे काम पूर्ण होणार का..? कि यंदा लालबागच्या राजाचा दरबार असाच राहणार..? याबाबत विविध प्रश्न उभे राहिले आहेत. ‘लालबागचा राजा’च्या भव्य देखाव्याबाबत बोलताना नितीन देसाई यांनी एका माध्यमाला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी म्हटले होते कि, ‘मी जेव्हाही बाप्पाची सेवा करतो तेव्हा वर्षभर आधीच त्यावर विचार करायला सुरुवात करतो. तो सेट बनवायला मला सहा महिने लागतात. लालबागच्या राजाच्या सेटच्या माध्यमातून मीही माझ्या कलेच्या विचारांची नव्याने सुरुवात करतो. म्हणूनच मला त्यावर 365 दिवस चिंतन करायला आवडतं’. नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या करावी असे नेमके काय घडले..? याचा शोध पोलीस घेत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, या घटनेमागे आर्थिक अडचण हे कारण असल्याचे सांगितले जात आहे.