हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशाचे परिवहन मंत्री मा. नितीन गडकरी यांनी ट्रक चालकांसाठी सर्वात महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ट्रक चालकांचे आयुष्य सुखकर होणार आहे. नितीन गडकरी यांनी ऑक्टोबर 2025 पासून सर्व ट्रकचे कॅबीन AC बनवण्यात यावे असे आदेश दिले आहेत. याबाबतची अधिसूचनाही केंद्रीय मंत्रालयाने जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार भारतात ट्रकचे उत्पादन घेणाऱ्या सर्व कंपन्यांना 1 ऑक्टोबर 2025 नंतर वातानुकुलीत ( एसी ) कॅबीन असलेल्याच ट्रक बाजारात विकता येणार आहेत.
ट्रक चालक 40°c पेक्षा अधिक तापमानात 12 ते 14 तास काम करतात :
ट्रक चालक वाहतूक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतात, जे भारतासाठी सर्वात महत्त्वाचे क्षेत्र आहे आणि त्यांच्या कामाच्या परिस्थिती आणि मानसिक स्थितीशी संबंधित समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.भारतातील ट्रक चालक 40°c पेक्षा अधिक तापमानात 12 ते 14 तास काम करतात त्यामुळे त्यांचे काम अधिक सुखकर व्हावे या दृष्टीकोनातून नितीन गडकरी यांनी आपल्या खात्याअंतर्गत येणारा हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे देशातील मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांचे आयुष्य सुखकर होणार आहे.
ट्रकचे AC कॅबीन करण्यासाठी अनेकांचा होता आक्षेप :
नितीन गडकरी यांनी सांगितले की, मी मंत्री झाल्यानंतर AC केबिन सुरू करण्यास उत्सुक होतो. मात्र त्यामुळे खर्च वाढणार असल्याचे सांगत काही लोकांनी विरोध केला. काहींनी यावर आक्षेप देखील घेतला पण मी फाईलवर सही केली आहे की सर्व ट्रक AC केबिन मध्ये असतील. त्यामुळे भविष्यात हा निर्णय अमलात येणार असल्याने अमूलाग्र बदल यामुळे वाहतूक क्षेत्रात घडून येणार आहे.या निर्णयानुसार 1 ऑक्टोबर 2025 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित केलेल्या वाहनांमध्ये N2 आणि N3 श्रेणीतील वाहनांच्या केबिनसाठी वातानुकूलन यंत्रणा बसवली जाईल.