हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला टक्कर देण्यासाठी देशात इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. परंतु आता या आघाडीला फोडण्यासाठी भाजपने खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून आता थेट मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना राज्यपालपदाची ऑफर देण्यात आली आहे. नितीश कुमार यांनी जर ही ऑफर स्वीकारली तर ते पुन्हा एनडीएमध्ये (NDA) सहभागी होऊ शकतात. परंतु ही ऑफर्स स्वीकारण्यापूर्वी नितेश कुमार यांना विधानसभा निवडणुकीत भाजपासमोर झुकणे मान्य करावे लागेल.
सध्या देशात आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. सर्वच पक्ष आपापल्या परीने विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपला हरवण्यासाठी देशातील 26 पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीमध्ये अनेक प्रमुख पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत इंडिया आघाडी भाजपवर भारी पडू शकते. मात्र आता ही वेळ येऊ नये यासाठी भाजपने आघाडीतील बड्या नेत्यांना हाताशी धरून त्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
राज्यपाल पदाची ऑफर
यापूर्वी देखील भाजपने नितीश कुमार यांना महाराष्ट्रातील राज्यपाल पदाची ऑफर दिली होती. परंतु त्यावेळी नितीश कुमार राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदावर अडून बसले होते. परंतु पुन्हा एकदा भाजपने नितेश कुमार यांनाही ऑफर दिली आहे. भाजप राज्यसभेचे उपसभापती हरिवंश व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यामार्फत नितीशकुमार यांच्याशी समझोता करण्याच्या प्रयत्नात आहे. अलीकडे नुकतीच नितीश कुमार यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. त्यामुळे नितेश कुमार पुन्हा भाजपच्या बाजूने कल घेतील असे म्हटले जात होते. आता या चर्चांना आणखीन उधाण आले आहे.
राजकीय तज्ञांच्या म्हणण्यानुसार, 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत जर भाजप विजयी झाला तर नवीन सरकारच्या स्थापने दरम्यान जदयूला अधिक महत्त्व दिले जाऊ शकते. म्हणजेच जदयूचे तीन केंद्रीय मंत्री आणि एक राज्यमंत्री अशी ऑफर भाजप जदयूला देऊ शकते. परंतु या सगळ्या गोष्टी घडण्यापूर्वी नितेश कुमार यांना भाजपच्या गोट्यात जाणे महत्त्वाचे असेल. दरम्यान, नितीश कुमार यांना इंडिया आघाडीतून बाहेर काढण्यासाठी भाजप यशस्वी ठरली तर याचा मोठा फटका आघाडीला बसू शकतो. यानंतर भाजप आणखीन नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू करेल.