औरंगाबाद | नव्याने सुरू होणाऱ्या कोविड केअर सेंटर्ससाठी महापालिका १ कोटी ४४ लाख रुपयांच्या खाटा खरेदी करणार आहे. या बाबतची प्रक्रिया सुरू झाली, असून निविदा काढून गरजेनुसार खाटा उपलब्ध करुन घेतल्या जातील. कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मार्चमध्ये या लाटेने रौद्ररुप धारण केले. रोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण शहरात आढळून येत आहेत. त्यामुळे नवीन कोविड केअर सेंटरसह जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
जम्बो कोविड केअर सेंटरसाठी पालिकेने दोन जागा निश्चित केल्या आहेत. त्याशिवाय कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी काही महाविद्यालयाचे होस्टेल, विद्यापीठातील होस्टेल ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर मंगल कार्यालयेही ताब्यात घेतली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ३१ मंगल कार्यालये ताब्यात घेण्याची प्रक्रियाही पालिकेने सुरू केली आहे.
नव्याने सुरु करावयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये खाटांसह आवश्यक ती सुविधा पालिका निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी पाच हजार खाटा खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शहर अभियंता विभागांतर्गत ही खरेदी होणार आहेत. यासाठी भांडार विभाग काम करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खाटा खरेदी करण्यासाठी एक कोटी ४४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सध्या हे अंदाजपत्रक लेखा विभागाच्या मंजूरीसाठी देण्यात आले आहे. लेखा विभागाच्या मंजूरीनंतर प्रशासकांची अंतिम मंजुरी मिळेल त्यानंतर निविदा काढली जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकदम पाच हजार खाटा खरेदी केल्या जाणार नाहीत. फक्त निविदा मंजूर केली जाईल आणि आवश्यकतेनुसार खरेदी केली जाईल. खाटांसाठीच्या गाद्या, उशांची खरेदी पालिकेने पूर्वीच केली आहे, त्यामुळे नव्याने गाद्या, उशा खरेदी केल्या जाणार नाहीत.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou