सांगली | जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्य शासनाच्या ब्रेक द चेन निर्बंध लागू केले आहेत. आंतरजिल्हा बंदी घालण्यात आली आहे. ई-पास साठी अर्ज करताना केवळ स्वयंघोषणापत्र अथवा कोणत्याही डॉक्टरचे कोविडची लक्षणे नसल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा उद्रेक होऊन रुग्णसंख्या दोन हजाराचा टप्पा पार करुन पुढे गेली आहे. शासन प्रत्येक पातळीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक गंभीर असून वेगाने वाढत आहे. राज्य शासनाच्या ब्रेक द चेन चे निर्बंध लागू आहेत व अंमलात आहेत. आंतरजिल्हा बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारची ई-पास ची गरज नाही. पण जर एखाद्या व्यक्तीला अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज आहे तर त्यासाठी ई-पास बंधनकारक आहे.
ई-पास साठी अर्ज करताना कोणत्याही प्रकारच्या कोविड निगेटीव्ह रिपोर्टची आवश्यकता नाही. ई-पास साठी अर्ज करताना केवळ स्वयंघोषणापत्र अथवा कोणत्याही डॉक्टरचे कोविडची लक्षणे नसल्याचे प्रमाणपत्र पुरेसे आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी केले आहे.