सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या सातारा जिल्हयातील मांढरदेवी यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे. मात्र , कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने यावेळची यात्रा रद्द केली असून देवीची रितीरिवाजा प्रमाणे पुजा करण्यात आली आहे. भाविकांना मात्र प्रशासनाने मांढरगडावर येण्यास बंदी घातली आहे. यावेळी मांढरदेव ट्रस्टने देवीच्या पुर्ण मंदीराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई केली आहे.. यामुळे रात्रीच्या वेळी आणि दिवसा मंदीर परिसर झगमगून गेला आहे.
वाई तालुक्यातील मांढरदेव गडावरील काळूबाई ही महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे लाखो भाविक काळूबाईची यात्रेला शाकंभरी पोर्णिमेला गर्दी करतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून या गडावरच्या काळूबाईची यात्रा भरवण्यास शासनाने बंदी घातली होती. गेल्या काही महिन्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी दिल्याने यंदाच्या वर्षी काळूबाईचे दर्शन होईल असं भाविकांना वाटत होतं. मात्र ओमायक्रॉनमुळे यंदाच्याही वर्षी मांढरदेवी गडावर यात्रेच्या दिवशी येण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.
शासनाच्या नियमामुळे भाविकांना यंदाही बंदी घालण्यात आली असली तरी दरवर्षीप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांमार्फत आणि गावातील ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीत आज यात्रा पूर्ण केली जात आहे. भाविकांनी गडावर येऊ नये यासाठी पंचक्रोशीतील सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले असून गडावर भाविकांना येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी उर्फ काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते, तिलाच शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात.