केंद्राची मोठी घोषणा! डॉक्टरांवर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात आता अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केली. देशातील कोरोना संकट काळात देवदूत म्हणून लोकांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे. डॉक्टरांवर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले मुळीच सहन केले जाणार नाहीत. असे प्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकारने नवा अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे असं जावडेकर यांनी स्पष्ट केलं.

सध्या करोनाच्या लढाईत डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी हे प्राणांची बाजी लावून लढत आहेत. मात्र त्यांच्याविरोधात हिंसा करण्याचे, त्यांना हीन वागणूक देण्याचे प्रकार देशात घडले हे दुर्दैवी आहे. यापुढे हे मुळीच सहन केले जाणार नाही. याचसाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढला आहे. Epidemic Diseases Act, 1897 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यावर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होईल. तसेच 3 महिने ते 5 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असेल आणि ५० हजार ते २ लाखापर्यंतचा दंडही वसूल करण्यात येईल असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं. तसेच एखाद्या व्यक्तीने संपत्ती किंवा डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या वाहनाचे नुकसान केले, तर अशा व्यक्ती किंवा व्यक्तींकडून दुप्पट पैसा वसूल केला जाईल अशी माहितीही जावडेकर यांनी दिली.

दरम्यान, डॉक्टरांवरचे हल्ले थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने अध्यादेश काढावा नाहीतर 23 एप्रिलला काळा दिवस पाळण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला होता. ज्यामध्ये देशातील सर्व डॉक्टर्स हातावर काळी पट्टी बांधून काम करणार होते. अशा वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज (बुधवार) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीनंतर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी आपला विरोध मागे घेतला. यादरम्यान त्यांनी डॉक्टरांच्या मेहनतीचं कौतुकही केलं. तसंच त्यांच्या सुरक्षेचं आश्वासन दिलं आणि प्रतिकात्मक विरोधही न करण्याचं आवाहन शाह यांनी डॉक्टरांना केलं. सरकार कायम डॉक्टरांसोबत आहे, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.

 

Leave a Comment