औरंगाबाद – वरिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन वर्ग न घेता जूनच्या मध्यापर्यंत ऑफलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. लसीचे दोन डोस बंधनकारक करणारी अट विद्यापीठाने मागे घेतली आहे. त्यामुळे डोस न घेतलेल्या किंवा एक डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची मुभा मिळणार आहे.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून उच्च शिक्षण विभागाने 18 वर्षावरील विद्यार्थ्यांना लसीचे दोन डोस सक्तीचे केले होते. दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय विद्यार्थ्यांना वर्गात बसू दिले जात नव्हते. त्यामुळे ऑक्टोबर 2019 पासून महाविद्यालये उघडली असली तरी वर्गात विद्यार्थ्यांची हजेरी नगण्य होती. अनेक विद्यार्थ्यांनी लस घेतलेली नाही. काहींनी लसीचा एक डोस घेतलेला आहे. दुसऱ्या डोससाठी त्यांना 84 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने वर्ग सुरू केले तरी महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. अलिकडेच काही दिवसांपूर्वी शासनाने कोरोना बाबतचे पूर्ण निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने आता वर्गात बसण्यासाठी लसीचे प्रमाणपत्र तपासण्याची अट रद्द केली आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या उन्हाळी सत्र परीक्षांना सुरुवात होणार आहे. जुलै अखेरपर्यंत या परीक्षा चालणार आहेत. 31 जुलै हा चालू शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस असणार आहे. 1 ऑगस्ट पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्ष आणि नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयांमध्ये जाऊन अध्ययन करावे लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.