हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मंदावली असली तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. सध्या जरी तिसऱ्या लाटेची शक्यता नसली तरी दिवाळीनंतर कोरोनाचे प्रमाण वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
राजेश टोपे म्हणाले, कोरोनाचा कुठलाही नवा व्हेरिएंट आढळून आलेला नाही, ही सगळ्यात जमेची बाजू आहे. डेल्टा व्हायरस हाच महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यावरील उपचारपद्धती आपल्याला माहिती आहे. आताच तिसऱ्या लाटेचे संकेत नाहीत. मात्र, दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असं असलं तरी आपण काळजी घेतली आणि लसीकरण वेगवान केलं तर काळजी करण्याचं कारण नसेल, असंही टोपे म्हणाले.
राज्यात ७० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ३५ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. राज्यात आणखीन वेगाने लसीकरण होणार आहे. लसीकरणासाठी मिशन कवच कुंडलचा फायदा झाला. देशातील १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार करण्यात महाराष्ट्राचा मोठा हातभार आहे. असेही त्यांनी सांगितले.