सातारा | कोरोना संशयित व बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड अँटिजेन अथवा आरटीसीपीआर चाचणीची माहिती आयएमसीआर पोर्टलवर न भरणाऱ्या जिल्ह्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकारामुळे गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीत तफावत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाची रॅपिड अँटिजेन टेस्ट अथवा आरटीसीपीआर टेस्टच्या चाचण्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व काही मान्यताप्राप्त खासगी लॅबमध्ये करण्यात येत आहेत. परंतु काही लॅंबमधीमध्ये तफावत आढळत असल्याने या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने कडक पाऊल उचलत कामात निष्काळजीपणा करण्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.
रुग्णाच्या चाचण्याचा माहिती न भरणाऱ्या आरोग्य केंद्रातील डॉ. पी. आर. कदम (तारळे, ता. पाटण), डॉ. उमेश गोंजारी (तळमावले, ता. पाटण), डॉ. शीतल सोनवलकर (फलटण), डॉ. संदीप खताळ (बिबी, ता. फलटण), डॉ. रामेश्वर सोडमिसे (साखरवाडी, ता. फलटण), डॉ. सारंग वाघमारे (तडवळे, ता. कोरेगाव), डॉ. रसिक गोखले (गोडोली नागरी आरोग्य केंद्र), डॉ. दीपक थोरात (कस्तुरबा नागरी आरोग्य केंद्र), डॉ. आदित्य गुजर (पुसेगाव, ता. खटाव), डॉ. ए. आर. ठिगळे (पुसेसावळी, ता. खटाव), डॉ. लक्ष्मण साठे (निमसोड, ता. खटाव) यांचा समावेश आहे.