MH-SET 2025 साठी अधिसूचना जाहीर; अर्जाची अंतिम तारीख आणि प्रक्रिया जाणून घ्या

0
146
MH-SET 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 40व्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH-SET) 2025 साठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही परीक्षा महाराष्ट्र व गोव्यातील विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी घेतली जाते. पात्र उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 13 मार्च 2025 आहे. त्यामुळे वेळ न वाया घालवता उमेदवारांनी आपल्या अर्ज सादर करावेत.

परीक्षेची वैशिष्ट्ये आणि पात्रता

MH-SET परीक्षा 15 जून 2025 रोजी ऑफलाइन स्वरूपात घेतली जाणार आहे. महाराष्ट्र व गोव्यातील 18 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून ती 32 विषयांसाठी घेतली जाईल. उमेदवारांकडे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन (UGC) मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 55% गुण आवश्यक असतील, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 50% गुण आवश्यक आहेत. अंतिम वर्षात शिकत असलेल्या किंवा निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येईल, मात्र त्यांनी दोन वर्षांच्या आत आवश्यक गुण मिळवणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया आणि शुल्क

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट setexam.unipune.ac.in वर जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी प्रथम नोंदणी करावी लागेल, त्यानंतर लॉगिन करून आवश्यक माहिती भरावी. अर्ज करताना फोटो व सही अपलोड करणे बंधनकारक आहे. परीक्षेसाठी आवश्यक विषय व केंद्र निवडून शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.

अर्ज शुल्क आणि अंतिम तारीख

सामान्य/EWS उमेदवार: 800

SC/ST/PwD/ट्रान्सजेंडर/अनाथ उमेदवार: 650

OBC/NT/SEBC (नॉन-क्रिमी लेयर) उमेदवार: 650

अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 मार्च 2025 असून विलंब शुल्कासह अर्ज करण्याची संधी 14 ते 21 मार्च 2025 या कालावधीत उपलब्ध असेल.

दरम्यान, या परीक्षेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही, त्यामुळे पात्र उमेदवार कोणत्याही वयोगटातील असले तरी अर्ज करू शकतात. एकदा विशिष्ट विषयातून SET परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या विषयासाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही. तसेच, पदव्युत्तर डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनी त्याची समकक्षता भारतीय विद्यापीठ संघटन (AIU) कडून पडताळून घ्यावी.