हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता तुरुंगातील कैद्यांनाही कर्ज देण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला आहे. तुरुंगात असलेल्या ज्या कैद्यांची घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही असे कैदी आता पर्सनल लोन घेऊ शकतील, तेही कोणत्याही जामीनदाराशिवाय आणि कमी व्याजदराने. विशेष म्हणजे भारतात असे पहिल्यांदाच घडत आहे.
पुण्याच्या येरवडा कारागृहात पायलट प्रोजेक्ट म्हणून ही योजना सुरू करण्यात येणार आहे. याअंतर्गत कैद्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या योजनेअंतर्गत कैद्यांना 7 टक्के व्याजदराने कर्ज देणार आहे. तुरुंगात केलेल्या कामाच्या मोबदल्यात त्यांना हे कर्ज मिळणार आहे. कारागृहातील कैद्यांना कर्जाची सुविधा दिली जात असताना देशात पहिल्यांदाच असे घडत असल्याचा दावा महाराष्ट्र सरकार करत आहे.
जामीनदाराची गरज नाही
कैद्यांचे उत्पन्न, दैनंदिन मजुरी, शिक्षेचा कालावधी, शिक्षेत मिळणारी सवलत, वय इत्यादींच्या आधारे सहकारी बँका कर्ज देतील. या कर्जासाठी जामीनदाराची गरज भासणार नाही. कर्ज केवळ पर्सनल गॅरेंटी द्वारे दिले जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील येरवडा कारागृहातील सुमारे 1,055 कैद्यांना सुरुवातीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यातील अनेक कैदी दीर्घकाळ शिक्षा भोगत आहेत. यातील बहुतेक कैदी त्यांच्या कुटुंबातील मुख्य कमावते सदस्य होते. तुरुंगात आल्यानंतर त्यांचे कुटुंब आर्थिक संकटातून जात आहे. त्या कैद्यांना कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आणि इतर कामांसाठी कर्ज दिले जाईल. या कैद्यांना ही कर्जाची रक्कम वकिलाची फी भरण्यासाठी देखील वापरता येणार आहे.