नवी दिल्ली । आता गेस्ट लेक्चरर म्हणून कमाई करणाऱ्या मास्तरच्या खिशालाही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कात्री लावली आहे. आता या कमाईवर 18 टक्के दराने GST भरावा लागेल. अॅथॉरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंग (AAR) च्या कर्नाटक खंडपीठाने एका निर्णयात हा आदेश दिला आहे.
याबाबत श्रीराम गोपालकृष्ण यांनी AAR समोर अपील करत गेस्ट लेक्चरर म्हणून कमावलेल्या उत्पन्नावर टॅक्स कसा भरावा लागेल अशी विचारणा केली होती. यावर निर्णय देताना खंडपीठाने म्हटले की, “प्रोफेशनल किंवा टेक्निकल किंवा बिझनेसशी संबंधित कोणतीही सर्व्हिस जर सूटच्या कक्षेत येत नसेल तर तिला सामान्य सर्व्हिस टॅक्सप्रमाणे 18 टक्के GST भरावा लागेल.”
‘या’ आदेशाचा अर्थ काय आहे ?
AAR ने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की, कोणतेही सर्व्हिस प्रोफेशनल्स ज्यांची वार्षिक उलाढाल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना गेस्ट लेक्चरच्या माध्यमातून मिळालेल्या अतिरिक्त कमाईवर 18 टक्के दराने GST भरावा लागेल. याचा अर्थ या सर्व्हिसवरही आता दूरसंचार किंवा इतर कंपन्यांप्रमाणे सर्व्हिस टॅक्स म्हणून GST आकारला जाईल.
‘या’ लोकांच्या कमाईवर परिणाम होणार आहे
या निर्णयानंतर फ्रीलांसर म्हणून काम करणाऱ्या लाखो लोकांच्या कमाईवर परिणाम होणार असल्याचे टॅक्स एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे. याशिवाय शैक्षणिक, रिसर्चर, प्रोफेसर आणि अशा इतर व्यावसायिकांशी संबंधित लोकांनाही मोठा टॅक्स भरावा लागेल. जे इंस्ट्रक्टर किंवा ट्रेनर किंवा मेंटॉर म्हणून पार्ट टाइम काम करतात त्यांना आपल्या कमाईवर 18 टक्के GST भरावा लागेल.