नवी दिल्ली । देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने ट्रेन तिकीटांच्या ऑनलाइन बुकिंगमध्ये थोडा बदल केला आहे. जर तुम्ही लॉकडाउनदरम्यान विशेष ट्रेनने प्रवास करणार असाल तर आता तुम्हाला तिकीट बुक करताना अजून एक महत्त्वाची माहिती द्यावी लागणार आहे. आता रेल्वे प्रवाशांना ते ज्या ठिकाणी चाललेत तेथील पूर्ण पत्ता द्यावा लागणार आहे. जर भविष्यात गरज पडली तर सहजपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करता येणे शक्य व्हावे यासाठी ही माहिती आता आयआरसीटीसीला द्यावी लागणार आहे. कालपासून (दि.१३) आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर तिकीट बुक करतेवेळी ही नवीन माहिती विचारण्यास सुरूवात झाली आहे.
दरम्यान, भारतीय रेल्वे प्रशासनाने ३० जूनपर्यंत रेल्वेच्या तिकिटांचे बुकींग करणाऱ्या प्रवाशांची तिकीटं रद्द करण्याची घोषणा केली आहे. या तिकिटांचे पैसे प्रवाशांना परत करण्यात येत आहेत. मात्र, रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे आणि श्रमिक विशेष रेल्वे मात्र सुरू राहतील. गुरुवारी रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी बुधवारी रेल्वेने लॉकडाऊन विशेष रेल्वेसाठी २२ मे पासून वेटिंग तिकिटांची सुरुवात करण्याचीही घोषणा केली आहे. सध्या, केवळ कन्फर्म तिकिटांचंच बुकिंग सुरू आहे. परंतु, २२ मे पासून सुरु होणाऱ्या प्रवासासाठी १५ मेपासून सुरु होणाऱ्या तिकीट बुकिंगमध्ये वेटिंग लिस्टचाही समावेश असेल. एसीमध्ये २०, एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये २०, सेकंड एसीमध्ये ५०, थर्ड एसीमध्ये १००, एसी चेअर कारमध्ये १०० आणि स्लीपरमध्ये २०० पर्यंट वेटिंग तिकीटं दिले जातील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”