हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव करून भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. बेळगाव महापालिकेवर भगवा फडकला आहे ना, मग बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव पालिकेच्या पहिल्याच सभेत पारित करा’, असं आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला. मग एक करा. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपाने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!, असं आव्हानच राऊत यांनी दिलं आहे.
बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात आमचा भगवा बेळगावर फडकला.मग एक करा.पालिकेच्या पहिलया सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा.महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणारया भाजपाने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 8, 2021
दरम्यान, बेळगाव महापालिकेत भाजपचा विजय झाल्यानंतर यापूर्वी देखील संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. बेळगाव मध्ये मराठी माणूस हरल्यानंतर पेढे वाटताना लाज नाही वाटली का?? अशा कडक शब्दांत त्यांनी टीका केली होती. बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाल्याबद्दल आज महाराष्ट्रात काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. मराठी माणूस हरल्यानंतर पेढे वाटले जात आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी नादानी आणि नालायकपणा झाला नाही असे राऊतांनी म्हंटल होत.